पुणे :राज ठाकरे (raj thackeray) बोलले की भोंगे उतरवले नाहीत तर आम्ही हनुमान चालिसा लावू, पण त्यांच्या या वक्तव्यामुळे माझ्या मतदारसंघात अनिष्ट परिणाम झाला आहे. त्यामुळे माझ्या मनात बेचैनी निर्माण झाली आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेच नगरसेवक वसंत मोरे (mns vasant more) यांनी सांगितले. याबाबत एकतर साहेब मला बोलावतील किंवा मी स्वत:च साहेबांकडे जाऊन माझे शंका निरसन करून घेईन, असे ते म्हणाले.
गुढीपाडव्याच्या सभेत बोलताना राज यांनी थेट हिंदुत्वाची पताका उंचावत वर अजानचे भोंगे उतरले नाहीत, तर आम्ही बरोबर त्यासमोरच हनुमान चालिसाचे भोंगे लावू असा जाहीर इशारा दिला. त्यावर बोलताना मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक मोरे म्हणाले, माझ्या मतदार संघात मुस्लिम मतदार आहेत. त्यांचे मनसेला, मला नेहमीच सहकार्य असते. सध्या त्यांचा रमजानचा महिना सुरू आहे. त्या भाषणानंतर लगेचच मला या मतदारांचे फोन आले. तात्या, तुम्ही कुठे भोंगा लावणार आहात का वगैरे त्यांनी भीतीदायक स्वरात विचारले.
त्यामुळेच माझ्या मनात बेचैनी निर्माण झाली आहे, असे मोरे यांनी सांगितले. साहेबांनी भोंगे उतरवले नाहीत तर असे म्हटले आहे, याचा अर्थ सरकारने यात लक्ष घालावे. त्वरित कारवाई करून सर्व भोंगे काढावेत असाही होतो, सरकारने पुढे येऊन अशी कारवाई करण्याची हिंमत दाखवावी असे मोरे म्हणाले. माझी भूमिका साहेबांपर्यंत पोहचली असेलच, ते मला नक्की बोलावतील व नाही बोलावले तर मी स्वत: जाऊन माझ्या मनातील शंका दूर करेन. या विषयावर स्थानिक नेत्यांशी बोलण्यापेक्षाही थेट साहेबांबरोबर बोलणेच योग्य राहील, असे मत मोरे यांनी व्यक्त केले.