नॉन ग्रँट महाविद्यालयांना नॅकचे वावडे
By Admin | Updated: February 7, 2017 03:18 IST2017-02-07T03:18:49+5:302017-02-07T03:18:49+5:30
पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व अनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे

नॉन ग्रँट महाविद्यालयांना नॅकचे वावडे
पुणे : पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व अनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील विनाअनुदानित तत्त्वावरील २५९ पैकी २२ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नॅक मूल्यांकनाचे विनाअनुदानित महाविद्यालयांना वावडे असल्याचे दिसून येत आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार महाविद्यालयांना नॅककडून मूल्यांकन करून घेणे अनिवार्य आहे. त्यानुसार उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करून घ्यावेत, अशा सूचना दिल्या होत्या. तसेच पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने विभागातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची याबाबत बैठक घेतली होती. तरीही केवळ २२ महाविद्यालयांनीच मूल्यांकन करून घेतले आहे.
पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे म्हणाले, की महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करून घेण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा व मार्गदर्शन केले जात आहे. विभागातील एकूण १६७ अनुदानित महाविद्यालयांपैकी १५९ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केले आहे.
उर्वरित महाविद्यालयांची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या एकूण २५९ विनाअनुदानित महाविद्यालयांपैकी केवळ 22 महाविद्यालयांनी नॅककडून मूल्यांकन करून घेतले आहे. (प्रतिनिधी)