कुणीही या, पीएमपी पळवा!

By Admin | Updated: March 20, 2015 00:56 IST2015-03-20T00:56:17+5:302015-03-20T00:56:17+5:30

शहराला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बहुतांश बस रात्री रस्त्यांवर पार्क केल्या जातात.

Nobody, PMP! | कुणीही या, पीएमपी पळवा!

कुणीही या, पीएमपी पळवा!

पुणे : शहराला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बहुतांश बस रात्री रस्त्यांवर पार्क केल्या जातात. त्यामुळे त्या कोणीही, कधीही पळवून नेऊ शकतो, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक बसला चाव्याच नसल्याने त्या बटन दाबून चालू करता येत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे. पुणे महापालिका भवनाजवळील रस्त्यांवर पीएमपीकडून लावण्यात येणाऱ्या अनेक बसमध्ये ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी मध्यरात्री जाऊन चालकाच्या सीटवर बसण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोठेही त्यांना हटकण्यात आले नाही. त्यामुळे ‘कोणीही या पीएमपी बस पळवून न्या,’ अशी स्थिती सध्या शहरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी रात्री एका चोरट्याने पीएमपीच्या मार्केट यार्ड डेपोबाहेर रस्त्यावर उभी करण्यात आलेली बस चोरून नेली होती. यावरून पीएमपीच्या बसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पीएमपीच्या कोणत्याही डेपोकडे बसचे पार्र्किंग करण्यासाठी पुरेशी जागाच नसल्याने बहुतांशी बस रस्त्यावर पार्क केल्या जातात. त्या बसवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत तोकडी सुरक्षाव्यवस्था असल्याने कधीही, कोणीही बस पळवून नेऊ शकेल, असे भयानक वास्तव स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे.

प्रत्येक बसला सुरक्षा पुरविणे शक्य नाही. बस लावण्याकरिता बंदिस्त जागा पीएमपीला मिळणे आवश्यक आहे. मुंबई सारख्या मोठ्या शहरातील बेस्टच्या सर्व गाडया या बंदिस्त जागांमध्ये रात्री पार्क केल्या जातात. विकास आरखडयामधील आरक्षित जागा पीएमपीला मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जकात नाक्यांच्या रिकाम्या असलेल्या जागा पीएमपीला तातडीने मिळाव्यात असा प्रस्ताव महापालिकांना देण्यात आला आहे, त्यावर लवकर निर्णय होणे आवश्यक आहे. जागा उपलब्ध झाल्यास त्यांचा मेटेन्ट ठेवणे, बे्रक डाऊनचे प्रमाण कमी करणे तसेच सुरक्षा ठेवणे शक्य होईल.
- श्रीकर परदेशी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

सीएनजी बसचे दरवाजे असूनही उघडेच
पीएमपीकडे सीएनजीवर चालणाऱ्या अनेक बस आहेत. त्यातील अनेक बस रात्री पालिका भवनाजवळील रस्त्यावर पार्क केल्या जातात. या सर्व बसला दरवाजे आहेत. मात्र, ते बंद करत नसल्याने या बसमध्ये कधीही कोणी चढत असल्याचे दिसून आले.

पीएमपीच्या काही बस स्टार्टरवर चालू होतात. तर काही गाड्यांना नॉब आहे. चावीचाच एक प्रकार म्हणजे नॉब असते. हे नॉब कोणीही बनवू शकते आणि त्याच्या माध्यमातून गाडी चालू करू शकतो. त्यामुळे पीएमपीच्या गाड्या कधीही चोरून नेणे शक्य आहे.

पीएमपीचे सुरक्षारक्षकच नाहीत
या रस्त्यावर पीएमपीच्या पार्क करण्यात आलेल्या बसची पाहणी करण्यासाठी सुरक्षारक्षकच दिसून आले नाहीत. येणाऱ्या बसची माहिती घेण्यासाठी पीएमपीचे काही कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करीत होते.

सुरक्षारक्षक व्यसनाधीन
खासगी ठेकेदारांच्या बसही या रस्त्यावर पार्क करण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक बसची सुरक्षा करण्यासाठी मोजकेच सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते. त्यातील काही सुरक्षारक्षक व्यसनाधीन असल्याचे दिसून आले. त्यामुळे ते गस्तच घालत नसल्याचे चित्र होते. या सुरक्षारक्षकांकडे सुरक्षेसाठी कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने ते बसचे गज घेऊन फिरत असल्याचे दिसले.

बसचा गैरवापर होण्याची भीती
या बस रस्त्यांवर बेवारसपणे उभ्या करण्यात येत असल्याने दहशतवादी त्यामध्ये बॉम्ब लावून त्याच्या माध्यमातून शहरात कधीही साखळी बॉम्बस्फोट करू शकतील, अशी परिस्थिती असल्याचे या स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.

 

Web Title: Nobody, PMP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.