पाणी नाही तर प्रभाग समितीची बैठकही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:19 IST2021-03-13T04:19:12+5:302021-03-13T04:19:12+5:30
पुणे : जोपर्यंत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत प्रभाग समितीची बैठक होऊ देणार नाही, असा पवित्रा सर्वपक्षीय नगरसेवकांनी ...

पाणी नाही तर प्रभाग समितीची बैठकही नाही
पुणे : जोपर्यंत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत प्रभाग समितीची बैठक होऊ देणार नाही, असा पवित्रा सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला. पाण्याच्या समस्येवरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत शुक्रवारी आयोजित केलेली बैठक बंद पाडली.
एकीकडे धरणात गतवर्षीपेक्षा दोन टीएमसी जादा पाणीसाठा असून पाणीकपात केली जाणार नसल्याचे प्रशासन म्हणते आहे. तर, दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती भागातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीची बैठक शुक्रवारी आयोजित केलेली होती. या बैठकीला प्रभाग समिती अध्यक्षांसह सर्व बारा नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. बैठक सुरू होताच नगरसेवकांनी प्रभाग क्रमांक १७,१८ आणि १९ मधील पाणी समस्येवर उपाय करण्याची मागणी केली.
शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या खडलवासला धरणासाखळीत मुबलक पाणी असतानाही शहरातील नागरिकांना पाणी का मिळत नाही, असा सवाल केला. नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणी वाढल्याचे नगरसेवकांनी सांगितले. प्रशासनाकडून कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय ही चर्चा सुरू राहिल्याने नगरसेवक संतापले. त्यांनी ही बैठक रद्द करीत जोपर्यंत या भागाला पाणी मिळणार नाही, तोपर्यंत प्रभाग समितीची बैठक होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला. बैठकीला उपस्थित असलेल्या उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना फोन लावून याविषयी उपाययोजना करण्याबाबत नगरसेवक आक्रमक असल्याचे सांगितले. पावसकर यांनी येत्या दोन दिवसांत पाण्याचा प्रश्न मार्ग लावत पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन दिले. जर दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर, सर्वपक्षीय १२ नगरसेवक पालिका आयुक्तांना घेराव घालणार असल्याचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी सांगितले.