लसीकरणाच्या नावाखाली कुणीही राजकारण करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:08+5:302021-05-15T04:09:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापालिका देखील मुंबई महापालिकेप्रमाणे लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढू शकते, त्यासाठी राज्य शासनाची ...

लसीकरणाच्या नावाखाली कुणीही राजकारण करू नये
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिका देखील मुंबई महापालिकेप्रमाणे लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढू शकते, त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घेण्याची गरज नाही. पण यासाठी गरज नसताना मला पत्र देऊन राज्य शासन पुणे महापालिकेला परवानगी देत नसल्याचे खोटे सांगून कारण नसताना राजकारण केले जात आहे. परंतु, लसीकरणाच्या नावाखाली राज्य शासनाला बदनाम करून कोणी राजकारण करू नये, असा सज्जड दमच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी येथे दिला.
पुणे शहर आणि जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना वरील विधान केले.
भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पुणे महापालिकेला लसीचे डोस खरेदी करण्यासाठी राज्य शासन परवानगी देत नसल्याचा आरोप केला होता. याबाबत पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले, सध्या राज्यात लसीचा तुटवडा आहे. केंद्र शासनाकडे मागणी करून ही पुरेसे डोस उपलब्ध होत नाहीत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या वतीने लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेला देखील लसीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या पिंपरी-चिंचवड महापालिका किंवा अन्य कोणीही ग्लोबल टेंडर काढू शकते. परंतु, मार्केटमध्येच लस उपलब्ध नाही, रशियाची लस सोडली तर अद्याप कोणाच्या लसीला परवानगी मिळालेली नाही. असे असताना केवळ लसीकरणाच्या नावाखाली राजकारण सुरू असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.