पुणे: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर तब्बल १३ दिवसांनी मुख्यमंत्री व २ उपमुख्यमंत्ऱ्यांची निवड झाली. आता त्यांची निवड झाल्यावर १० दिवस होऊन गेल्यावर मंत्रीमंडळाचा विस्तार होत आहे. पुण्यात किमान ५ मंत्री अपेक्षित असून त्यात पुणे शहरात २ व जिल्ह्यात ३ अशी संख्या असल्याचे दिसते आहे. शपथविधी कार्यक्रम मुंबईबाहेर म्हणजे नागपूरला रविवारी (दि.१५) होत असून त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून सोमवारी (दि.१६) विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनास सुरूवात होईल.
जिल्ह्यातील २१ आमदारांपैकी फक्त वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बापू पठारे व खेड-आळंदीतील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे वगळता सर्व आमदार सत्ताधारी महायुतीचे आहेत. जुन्नर विधानसभेतून शरद सोनवणे अपक्ष म्हणून निवडून आलेत पण त्यांनी लगेचच शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे सत्ताधारी महायुतीचे २१ पैकी १८ आमदार जिल्ह्यात आहेत. त्यातील किमान ५ जणांना मंत्रीपदे मिळतील अशी अपेक्षा आहे.
ज्येष्ठतेमध्ये शहरात पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ यांचे नाव आघाडीवर आहे. कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील पक्षात ज्येष्ठ आहेत, व त्यांचे मंत्रीपद फिक्स मानले जात आहे. दौंडमधील भाजपचे राहूल कूल यांचे नाव आघाडीवर आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडमधील महेश लांडगे हेही इच्छुक आहेत. कॅन्टोन्मेट चे आमदार सुनिल कांबळे यांनाही सामाजिक समतोल साधण्यासाठी म्हणून मंत्री करतील अशी चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या आमदारांमध्ये स्वत: अजित पवार उपमुख्यमंत्री आहेतच. आंबेगावमधील या पक्षाचे आमदार दिलीव वळसे ज्येष्ठ आहेत. त्यांचे नाव ही फिक्स समजले जाते. सत्तावाटपात अजित पवार गटाला सर्वात कमी मंत्रीपदे मिळणार आहेत. त्यामुळे ते जिल्ह्यात फार कोणाला संधी देतील अशी अपेक्षा नाही. तीच परिस्थिती शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची आहे. त्यांचे दोन आमदार (एक अपक्ष) जिल्ह्यात आहेत. त्यातील पुरंदरचे विजय शिवतारे माजी राज्यमंत्री आहेत. त्यांना आता कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा आहे. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी त्यांना मंत्रीपद दिले जाईल असे बोलले जाते.
मात्र यातील कोणालाही मुंबईतून अद्याप फोन वगैरे काहीही आलेला नाही. कोणी कसला निरोपही दिलेला नाही. मंत्रीपदासाठी इछ्छुक असलेल्या काही आमदारांबरोबर संपर्क साधला असता त्यांनीच अजून काहीही कळवले नसल्याचे सांगितले. पुण्याहून नागपूरला विमानाने जायचे म्हटले तरी किमान काही तास लागतील. रविवारी सकाळी ११ वाजता शपथविधी असेल तर आतापर्यंत निरोप यायला हवा होता. शपथविधीचा कार्यक्रम सायंकाळी असेल तर रात्री उशिरा मंत्रीपद ज्यांना द्यायचे आहे, त्यांना कळवले जाईल असे दिसते आहे.