स्थापलीच नाही चौकशी समिती
By Admin | Updated: August 13, 2014 04:19 IST2014-08-13T04:19:08+5:302014-08-13T04:19:08+5:30
या समितीत अॅड. रमा सरोदे यांना घेण्यास आयोगाने सांगितले होते. मात्र अजूनपर्यंत पालिकेने सरोदे यांच्याशी संपर्कच साधलेला नाही.

स्थापलीच नाही चौकशी समिती
पुणे : पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याचा त्यांच्या विभागप्रमुखांकडून होत असलेल्या छळाचा तपास करण्यासाठी राज्य महिला आयोगाने दोन महिन्यांपूर्वी समिती स्थापण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांना दिले होते. ही समिती स्थापून तीन महिन्यांत अहवाल द्यावा, असे महिला आयोगाने सांगितलेले असताना, प्रत्यक्षात ही समितीच अजून अस्तित्वात आलेली नाही.
विशेष म्हणजे, या समितीत अॅड. रमा सरोदे यांना घेण्यास आयोगाने सांगितले होते. मात्र अजूनपर्यंत पालिकेने सरोदे यांच्याशी संपर्कच साधलेला नाही. यावरून पालिकेने राज्य महिला आयोगाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षत दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कामाच्या ठिकाणी विभागप्रमुखांकडून छळ होत असल्याच्या कारणावरून पालिकेतील एका महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली होती. त्याची तातडीने दखल घेत आयोगाने सुनावणी सुरू केली होती. या सुनावणीला संबंधित महिला अधिकारी आणि पालिकेचे आयुक्त यांना वेळोवेळी हजर राहण्याचे आदेश आयोगाने दिले होते. मात्र पालिका आयुक्त हजरच राहिले नाहीत. त्यामुळे २६ मे रोजी आयोगाने पालिकेला आदेश दिला, की संबंधित महिला अधिकाऱ्याचे कामकाज दुसऱ्या प्रमुखांकडे ७ दिवसांत द्यावे आणि या छळाची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी. ज्यामध्ये अॅड. रमा सरोदे यांना घेण्यात यावे आणि त्यांच्यासमवेत तपास करण्यात यावा. हा आदेश देऊन दोन महिने उलटून गेले तरी अशी कोणतीही समिती पालिकेने स्थापलेली नाही. (प्रतिनिधी)