दोन वर्षात रुग्णालयांच्या ‘फायर सेफ्टी’वर बजेटच नाही केले खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:27 IST2021-01-13T04:27:54+5:302021-01-13T04:27:54+5:30
पुणे : शहरातील हजारो रुग्णांवर उपचार केल्या जाणा-या पालिकेच्या ७४ रुग्णालयांमधील अग्निप्रतिरोधक यंत्रणेचे ॲाडिट करणे तर दुरच परंतु, गेल्या ...

दोन वर्षात रुग्णालयांच्या ‘फायर सेफ्टी’वर बजेटच नाही केले खर्च
पुणे : शहरातील हजारो रुग्णांवर उपचार केल्या जाणा-या पालिकेच्या ७४ रुग्णालयांमधील अग्निप्रतिरोधक यंत्रणेचे ॲाडिट करणे तर दुरच परंतु, गेल्या दोन वर्षात ‘अग्निसुरक्षे’वर (फायर सेफ्टी) अंदाजपत्रकात तरतूद असूनही खर्च करण्यात आलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदा तरी हा निधी खर्ची पडावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.
शहरामध्ये महापालिकेची छोटी-मोठी मिळून एकूण ७४ रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये शेकडो नागरिक दररोज उपचारांसाठी जात असतात. यासोबतच प्रसुतीगृहांमध्ये तर महिला प्रसुतीसाठी दाखल होत असतात. कमला नेहरु, सोनावणे, राजीव गांधी आदी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करुन घेतले जाते. या रुग्णालयांमधील अग्निरोधक यंत्रणा गंजलेली आहे. भंडारा जिल्ह्यातील अग्निकांडानंतर जाग आलेल्या प्रशासनाने रुग्णालयांच्या फायर सेफ्टीचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे अग्निशामक दलाला हे ऑडिट करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
वास्तविक आरोग्य विभागासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तब्बल ४५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु, हा निधीच खर्च करण्यात आलेला नाही. आरोग्य विभागाकडे फायर सेफ्टीकरिता स्वतंत्र निधी पुर्वी नव्हता. त्यामुळे २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात नवीन बजेटहेड निर्माण करुन तरतूद करण्यात आली. या निधीमधून सुरक्षा उपकरणे खरेदी केले जाणे अपेक्षित होते. तसेच दरवर्षी फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट केले जाणेही अपेश्खित आहे. परंतु, याकडे पालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.
मागील दोन वर्षात अंदाजपत्रकातील तरतूद खर्च न झाल्याने यंदा मात्र ही तरतूद खर्च करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सुरक्षा साधने खरेदी करुन रुग्णालयांमध्ये बसविली जाणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.