रेल्वे स्थानकाच्या वास्तूला झाली नव्वद वर्षे
By Admin | Updated: July 27, 2015 03:38 IST2015-07-27T03:38:00+5:302015-07-27T03:38:00+5:30
: ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीला सोमवारी ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या ९० वर्षांत पुणे रेल्वे

रेल्वे स्थानकाच्या वास्तूला झाली नव्वद वर्षे
पुणे : ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीला सोमवारी ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या ९० वर्षांत पुणे रेल्वे स्थानकात अनेक बदल झाले असले, तरी ही वास्तू आजही दिमाखात उभी आहे. देशातील ‘ए १’ दर्जा मिळालेल्या मोजक्या रेल्वे स्थानकांत पुणे स्थानकाचाही समावेश आहे.
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवेश केल्यानंतर समोरच ऐतिहासिक वास्तू नजरेस पडते. आशिया खंडातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे यादरम्यान १६ एप्रिल १८५३ मध्ये धावली. त्यानंतर पुढे ही रेल्वे ठाणे ते कल्याण (१ मे १८५३), कल्याण ते पलसदरी (१२ मे १८५६), पलसदरी ते खंडाळा (मार्च १८६१) अशी धावली. पुढे खंडाळा ते पुणे हा मार्ग तयार करून १४ जून १८५८ ला पुण्यात पहिली रेल्वेगाडी आली. तेव्हापासून पुण्याचे महत्त्व वाढत गेले. त्यानंतर ब्रिटिशांनी मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशनचा (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) विकास करीत असताना पुणे रेल्वे स्थानकातही सुधारणांना प्राधान्य दिले. ब्रिटिश लष्कराच्यादृष्टीने पुणे हे शहर महत्त्वाचे होते. शेती, उद्योगक्षेत्र, व्यापार यांना उत्तेजन देण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकाला अधिक सुविधा देण्याची तरतूद १८८५-८९ मध्ये करण्यात आली. त्यानुसार सुविधा, गाड्यांची संख्या वाढत गेली.
पुणे स्थानकाच्या इमारतीचा पहिला आराखडा १९१५ मध्ये तयार झाला. तर प्रत्यक्ष कामाला १९२२ मध्ये सुरूवात झाली. त्यानंतर तीन वर्षांत स्थानकाची ऐतिहासिक वास्तू उभी राहिली. त्या वेळी संपूर्ण इमारतीला ५ लाख ७९ हजार ६६५ रुपये खर्च आला. ही वास्तू व लाहोर जंक्शनचा आराखडा सारखाच आहे. या ब्रिटिशकालीन वास्तूला सोमवारी ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या ९० वर्षांच्या कालखंडात पुणे रेल्वे जंंक्शनने अनेक चढउतार पाहिले. दररोज शेकडो गाड्यांचे फेऱ्या, तर लाखो प्रवाशांची ये-जा असलेल्या या स्थानकाने देशांतही नावलौकिक मिळवला आहे.