गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊजण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:20 IST2021-03-13T04:20:03+5:302021-03-13T04:20:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी शास्त्री रस्त्यावर केलेल्या अघोषित आंदोलनाचे नेते बनलेले भाजपचे ...

गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊजण अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी शास्त्री रस्त्यावर केलेल्या अघोषित आंदोलनाचे नेते बनलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ९ जणांना पोलिसांनी अटक केली. मध्यरात्री पोलिसांनी त्यांची जामिनावर मुक्तता केली. दरम्यान, याप्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राज्यसेवा परीक्षा येत्या रविवारी (दि.१४) होणार होती. नियोजित एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलने केली होती. या आंदोलनाला पुण्यापासून सुरुवात झाली. त्याच वेळी या आंदोलनाला पाठिंबा देत आमदार पडळकर आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर देखील पडळकर यांनी आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेत आजची रात्र रस्त्यावरच काढणार असल्याची घोषणा केली होती. अनेकदा पोलिसांनी विनंती करूनदेखील पडळकर हे आंदोलनस्थळ सोडत नाही ते लक्षात आल्यानंतर, पोलिसांनी बळाचा वापर करून पडळकर, विक्रांत पाटील, पुनीत जोशी, प्रदीप देसरडा, लक्ष्मण हाके, अभिजित राऊत, संतोष कांबळे, धीरज घाटे यांच्यासह नऊ जणांना रात्री ताब्यात घेतले होते. मध्यरात्री पोलिसांनी त्यांची जामिनावर मुक्तता केली. याप्रकरणात पडळकर यांच्यासह एकूण २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.