संग्रहित चित्रपटांचे एनएफएआय मूल्यमापन करणार
By Admin | Updated: January 28, 2017 01:18 IST2017-01-28T01:18:17+5:302017-01-28T01:18:17+5:30
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील (एनएफएआय) एखादा चित्रपट कुठल्या महोत्सवात किंवा इतरत्र कुठल्या ठिकाणी दाखवायचा झाल्यास

संग्रहित चित्रपटांचे एनएफएआय मूल्यमापन करणार
पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील (एनएफएआय) एखादा चित्रपट कुठल्या महोत्सवात किंवा इतरत्र कुठल्या ठिकाणी दाखवायचा झाल्यास सर्वप्रथम त्या चित्रपटाची स्थिती, दर्जा कसा आहे, याची तांत्रिकदृष्ट्या संस्थेत पाहणी केली जाते, मगच तो चित्रपट कुठल्या फॉरमॅटमध्ये दाखवता येणे शक्य आहे याचा अंदाज घेतला जातो. आजवर गरजेनुसार पार पडणारी ही प्रक्रिया. मात्र यापुढील काळात ‘फिल्म कंडिशन असेसमेंट’ या प्रकल्पांतर्गत एनएफएआय स्वत:कडे असलेल्या सुमारे १९ हजार चित्रपटांच्या तब्बल १ लाख ३० हजार रिळांची तपासणी करून त्याचे दर्जात्मकतेनुसार मूल्यमापन करणार आहे, उद्यापासून (शनिवार) नॅशनल हेरिटेज मिशन अंतर्गत या प्रकल्पाला सुरुवात होत आहे.
सध्या एनएफआयकडे १९ हजार भारतीय- विदेशी चित्रपट आणि लघुपटांचा संग्रह आहे, याची १ लाख ३२ हजार रिळं आहेत, त्यापैकी भारतीय चित्रपटांच्या रिळांची अवस्था काय आहे, आवाज कसा आहे, ती पूर्ण आहेत का? पिक्चर चांगला आहे का? हे कळण्यासाठी ए (चांगली) बी (मध्यम) आणि सी (वाईट) अशा तीन विभागांत तपासणी करून दर्जात्मकतेप्रमाणे त्याचे मूल्यमापन केले जाणार आहे. ही तपासणी प्रक्रिया सहा महिने चालणार असून, त्यानंतर चित्रपटांचे ऐतिहासिक महत्त्व आणि दुर्मिळता लक्षात घेऊन निवडक चित्रपटांचेच डिजिटायझेशन करणे आणि त्यानंतर त्याचे जतन करणे अशा दोन टप्प्यात पुढील प्रक्रिया पार पडणार आहे. २०१० ते २०१२ या दोन वर्षांच्या कालावधीत ५०० चित्रपट डिजिटाईज आणि ३२५ चित्रपट जतन करण्यात आले आहेत. येत्या २०२१ पर्यंत अंदाजे हजाराच्या आसपास चित्रपट आणि लघुपटांचे डिजिटायझेशन आणि हजार चित्रपटांचे जतन करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे, याशिवाय दुर्मिळ संग्रहाचे आंतरराष्ट्रीय दर्जानुसार कॅटलॉगिंगदेखील केले जाणार असल्याची माहिती एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. तसेच एखाद्या चित्रपटाविषयी माहिती हवी असेल उदा : ‘शोले’ तर त्याचे बुकलेट, पोस्टर, त्यावर आधारित पुस्तक यापासून हा चित्रपट कुठल्या फॉरमॅटमध्ये (३२ एमएमएम, सेल्युलाईड, डीसीपी) उपलब्ध आहे याची संपूर्ण माहिती ‘आयटी पोर्टल’ वर देण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे. हे पोर्टल संकेतस्थळाला संलग्न असेल, असेही त्यांनी सांगितले.