गुंठेवारीचा निर्णय येत्या चार दिवसांत : मुख्यमंत्री
By Admin | Updated: July 18, 2014 03:47 IST2014-07-18T03:47:22+5:302014-07-18T03:47:22+5:30
गुंठेवारीच्या प्रश्र्नावर येत्या चार दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले आहे

गुंठेवारीचा निर्णय येत्या चार दिवसांत : मुख्यमंत्री
उरुळी कांचन : गुंठेवारीच्या प्रश्र्नावर येत्या चार दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष व थेऊरगावचे सरपंच नवनाथ काकडे यांनी ही माहिती दिली.
राज्यातील विविध
गावांच्या सरपंचांची परिषद नुकतीच थेऊर येथे झाली. या परिषदेत ठरल्याप्रमाणे विविध प्रश्र्नांवर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहात आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गुंठेवारीबाबत लवकर निर्णय घेणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.
बैठकीस विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, महसूल विभागाचे अति. सचिव, स्वाधीन क्षत्रिय सहसचिव एस. के. पाटणकर, नगर विकास सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्रामविकास अति. सचिव एस. एस. संधू, तसेच इतर संबंधित अधिकारी आणि सरपंच परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत ग्रामपंचायतीस बांधकाम परवानगी व नोंदीचे अधिकार मिळणे, गावठाण हद्दवाढ, निवासी क्षेत्रवाढ, जुनी व नवी बांधकामे नियमित करणे, तुकडे बंदी कायदा रद्द करून ७/१२ नोंदी होणे, २०११ ची जनगणना निकष लागू करणे, स्वाधीन क्षत्रिय समितीच्या अहवालात दुरुस्ती वटहुकूम जारी करणे आदी विविध विषयांवर चर्चा झाली.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी गावठाण हद्द १५०० मीटरने वाढविणे व २०११ ची जणगणना निकष लागू करण्याचे आदेश तत्काळ संबंधित सचिवांना दिले. तथापि, इतर प्रश्र्नांसंबंधी ताबडतोब अहवाल मंत्रिमंडळांच्या बैठकीपुढे सादर करण्याच्या सूचना दिल्याचे काकडे यांनी सांगितले.
शिष्टमंडळामध्ये पुणे विकास मंचचे अध्यक्ष सदाअण्णा पवार, महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र नेवसे, सहसचिव सचिन सातव, कोषाध्यक्ष चंद्रहार चव्हाण, आव्हाळ वाडीचे सरपंच प्रवीण आव्हाळे, बगेरेचे सरपंच भाऊसाहेब मरगळे, जातेगावचे सरपंच समाधान डोके, पुणे विकासमंचचे गीताराम कदम, राजेंद्र दणके, अॅड. राजू राजूरकर, बाबासाहेब गलांडे, अॅड. पंडित कापरे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)