पुण्यातील एका भागात डीमार्ट रेडी बंद होत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ५० टक्के डिस्काऊंटवर सारेकाही खरेदी करता येत असल्याने नागरिकांची झुंबड उडाल्याचा प्रकार घडला आहे.
डीमार्टमधील गर्दी टाळण्यासाठी व ग्राहकांच्या सोईसाठी दोन वर्षांपूर्वी बोपोडी भागात डीमार्ट रेडी सुरु करण्यात आले होते. काही मोजक्या वस्तू तिथे विकायला ठेवण्यात येतात. शहरांच्या विविध भागात डीमार्टने ही सुविधा सुरु केलेली आहे. डीमार्टच्या अॅपवरून धान्य, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू मागविणाऱ्यांना तिथूनच डिलिव्हरी दिली जाते. यामुळे मुळ डीमार्टमध्ये गर्दी होत नाही व कंपनीचीही विक्री होते.
बोपोडीतील ग्राहकांना हे डीमार्ट रेडी फायद्याचे ठरत होते. लहान मुलांचे वाढदिवस असतील किंवा अन्य कोणाला गिफ्ट घ्यायचे असेल तर तिथून खरेदी केली जायची. दूध, आईस्क्रीम, चहाचे कप, टॉवेल, टीशर्ट, एलईडी बल्ब आदी देखील तिथे मिळत होते. परंतू, ३१ डिसेंबरच्या सायंकाळी अचानक या स्टोअरमध्ये गर्दी होऊ लागली.
या डीमार्ट रेडीमध्ये ५० टक्के डिस्काऊंटवर सगळे काही विकले जात असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ग्राहकांची झुंबड उडाली. अनेकांनी जे जे मिळेल ते, उपयोगाचे नसले तरीही खरेदी केले आहे. उरलेल्या वस्तू दुसऱ्या दिवशी सकाळी ११-१२ वाजेपर्यंत संपल्या होत्या. अनेकांनी घ्यायचे होते पण पुढे घेऊ असे म्हटलेले त्या वस्तू देखील निम्म्या किंमतीत मिळतायत म्हणून घेऊन टाकल्या.