स्वारगेट प्रकरण: ‘ती’ मेल्यागत पडून राहिली अन् ‘तो’ अत्याचार करत होता; बचावासाठी ओरडली, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 06:26 IST2025-03-03T06:23:11+5:302025-03-03T06:26:10+5:30
त्याच्याकडे याचना: काय करायचे ते कर, पण मला जीवंत ठेव...

स्वारगेट प्रकरण: ‘ती’ मेल्यागत पडून राहिली अन् ‘तो’ अत्याचार करत होता; बचावासाठी ओरडली, पण...
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय युवतीवर बलात्कार करणारा नराधम दत्तात्रय गाडे हा पुणे पोलिसांनी अटकेत आहे. या घृणास्पद घटनेनंतरही आरोपीला त्याच्या कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. २५) घडलेल्या अत्याचारावेळी आरोपीने आपल्याला जिवंत सोडावे, यासाठी पीडितेने त्याला गयावया केल्याची माहिती समोर आली आहे.
पीडितेला आपण बसमध्ये कंडक्टर असल्याचे खोटे सांगून आरोपी तिला घेऊन गेला. ती बसमध्ये जाताच त्याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला. त्यानंतर पीडितेने बसमध्ये कोणीच नाहीये, मला खाली जायचे आहे, मला खाली जाऊ दे, अशी विनवणी केली. त्यानंतर आरोपीने पीडितेला बसच्या सीटवर ढकलून दिले. पीडितेने मदतीसाठी आवाजही दिले; मात्र आरोपीने तिचा गळा दाबला. आरोपीने आपल्याल जिवंत सोडावे यासाठी ती बचावाच्या प्रयत्नात होती.
आरोपीच्या खात्यात महिनाभरापासून २४९ रुपये
स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणात आरोपीचे वकील न्यायालयात संगनमताने हा प्रकार झाल्याचे सांगतात. त्यावेळी आरोपी दत्तात्रय याने काही पैसे दिल्याचेदेखील सांगितले गेले. तपासात मात्र आरोपीच्या बँक खात्यात घटनेपूर्वी महिनाभरापासून केवळ २४९ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी अशा परिस्थितीत कुठून पैसे देईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिसांनी तपासले दोघांच्या मोबाइलचे २ वर्षांचे सीडीआर
पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर आरोपी दत्तात्रय आणि पीडितेच्या मोबाइलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासण्यात आले आहेत. त्यात कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून न आले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्याच्याकडे याचना : काय करायचे ते कर, मला जीवंत ठेव...
पीडिता घाबरली आहे, ती प्रतिकार करत नसल्याचे लक्षात येताच नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केल्याची बाब याप्रकरणात समोर आली. तिने काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव, अशी याचना नराधमाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आरोपी दत्तात्रय बसमधून उतरल्यानंतर पीडितेने बसने गावाला जात असताना तिच्या मित्राला आणि बहिणीला फोनद्वारे तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी पीडितेला धीर देत स्वारगेट पोलिस ठाण्यात जात आरोपीविरोधात तक्रार देण्याचे सांगितल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.