ना उमेदवार ना कार्यकर्त्यांना सोशल डिस्टनसिंग चे भान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:27 IST2021-01-13T04:27:24+5:302021-01-13T04:27:24+5:30
पुरंदर तालुक्यात येत्या १५ जानेवारी रोजी ६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सद्या या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून आपापल्या पॅनेलच्या ...

ना उमेदवार ना कार्यकर्त्यांना सोशल डिस्टनसिंग चे भान
पुरंदर तालुक्यात येत्या १५ जानेवारी रोजी ६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सद्या या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून आपापल्या पॅनेलच्या उमेदवारांचा प्रचार उमेदवार आणि कार्यकर्ते करताना दिसत आहेत. तालुक्यातील ६८ ग्राम पंचायतीपैकी १२ ग्राम पंचायतीनी खासदार सुप्रिया सुळे आणि आ संजय जगताप यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बिनविरोध केल्या आहेत. गेल्या दहा वर्षात पिंगोरी येथे विकास कामे न झाल्याचा ठपका ठेवत येथील ग्रामस्थांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यातही २१ ग्राम पंचायतीत अनेक ठिकाणचे उमेदवार बीन बिरोध झालेले असल्याने तालुक्यातील एकूण ५९८ जागांपैकी १७० जागा बिन विरोध झाल्या आहेत. तर ११ ठिकाणी उमेदवारी अर्जच आलेले नाहीत. सद्या ४१७ जागांसाठी ८९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भविष्य आजमावत आहेत. प्रचार आता केवळ दोन दिवस राहिलेला असल्याने कार्यकर्त्यांची तसेच मतदारांची चंगळ सुरू आहे. उमेदवारांकडून मतदारांना वेगवेगळी प्रलोभने दाखवली जात आहेत. जेवणावळी उठत आहेत तर मकर संक्रांतीचा सण असल्याने संक्रात वाण, साड्या वाटप तर काही ठिकाणी खाद्यपदार्थांचे वाटप होताना दिसत आहे. या निवडणुकीत गावागावातील प्रस्थापितांच्या विरोधात तरुणाई एकवटल्याचे निदर्शनास येत आहे. एकंदरीत या निवडणुकीवर तरुणांचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. यामुळेच प्रचार यंत्रणा ही तेवढीच जोरकसपणे राबवली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून प्रचाराचे निर्देश दिलेले आहेत. मात्र या निर्देशांकडे कोणीही लक्ष देत नसून दिवसेंदिवस प्रचारात चुरसच दिसून येत आहे. प्रशासनाने निवडणूक चिन्ह वाटपावेळीच प्रचार करताना शोषल डिस्टनसिंग पाळण्याचा सूचना दिल्या आहेत. मास्क आणि योग्य अंतर ठेवून प्रचार करण्याचा सूचना आहेत. मात्र सुरुवातीला प्रचार करताना या अटी व नियमांचे पालन केले जात होते. मात्र प्रचारात जस जशी चुरस वाढू लागली तस तसा या नियमांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होऊ लागले आहे. ठिकठिकाणी प्रचाराच्या रॅली निघू लागल्या आहेत. कोपरा सभांचे आयोजन करून गर्दी जमवण्याचा व विरोधी उमेदवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. या संदर्भात अनेक उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी संपर्क साधून प्रचारात नियम पाळले जात नाहीत याबद्दल विचारणा केली असता कोणीच नियम पळत नसल्याने आम्ही का पाळावेत असा उलट प्रश्न केला जात आहे.