पुणे : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने देशभरात ८० विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या यादीत पुणे-मुंबई मार्गावर इंटरसिटी गाड्यांकडे कानाडोळा करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातूनही केवळ मुंबई-मनमाड, परभणी- हैद्राबाद आणि सोलापुर-म्हैसुर या तीनच गाडयांना हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे प्रवाशांची निराशा झाली आहे.कोरोना संकटामुळे देशातील रेल्वेगाड्या लॉकडाऊनच्या काळात बंद होत्या. अनलॉकमध्ये दि. १ जूनपासून देशभरात २३० विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. त्यामध्ये पुण्याच्या वाट्याला पुणे-दानापुर एक्सप्रेस ही एकमेव गाडी आली. तर मुंबईतून धावणाऱ्या तीन आणि गोवा एक्सप्रेस या गाड्या पुणेमार्गे धावत आहेत. पुण्यातून मुंबईला दररोज शेकडो प्रवासी दररोज जातात. सध्या शिवनेरी बससेवा सुरू केली असली तरी तिकीट दर परवडत नसल्याने अनेकांनी खासगी वाहनांना पसंती दिली आहे. राज्यात आता आंतरजिल्हा प्रवासावरील बंदीही उठविली आहे. रेल्वेतूनही आंतरजिल्हा तिकीट उपलब्ध होत आहे. त्यामुळे एखादी पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी होत आहे. रेल्वे मंत्रालयाने ८० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यात पुणे-मुंबईला एखादी गाडी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुणेकरांच्या पदरी निराशा पडली आहे.नवीन ८० विशेष गाड्यांमध्ये मुंबई-मनमाड एक्सप्रेस, सोलापुर-म्हैसुर एक्सप्रेस आणि परभणी-हैद्राबाद एक्सप्रेस या तीन गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. तीनही गाड्या दररोज धावणार आहेत. सध्या पुण्यातून मराठवाडा, विदर्भात जाण्यासाठी एकही रेल्वेगाडी नाही. तसेच एसटीनेही मर्यादीत स्वरूपात बससेवा सुरू केली आहे. पण अनेकजण लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. या भागासाठी एकही गाडी नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.----------
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या नव्या विशेष रेल्वे गाड्यांमध्येही पुणे-मुंबईकडे 'कानाडोळा'; प्रवाशांची निराशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 12:13 IST
महाराष्ट्रातूनही केवळ मुंबई-मनमाड, परभणी- हैद्राबाद आणि सोलापुर-म्हैसुर या तीनच गाडयांना हिरवा कंदील
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या नव्या विशेष रेल्वे गाड्यांमध्येही पुणे-मुंबईकडे 'कानाडोळा'; प्रवाशांची निराशा
ठळक मुद्देसध्या पुण्यातून मराठवाडा, विदर्भात जाण्यासाठी नाही एकही रेल्वेगाडी