नीरा नदीची लचकेतोड सुरूच

By Admin | Updated: July 3, 2017 02:54 IST2017-07-03T02:54:36+5:302017-07-03T02:54:36+5:30

नीरेची लचकेतोड सुरूच आहे. नदीमधून होत असलेल्या बेकायदेशी व बेसुमार वाळूउपशामुळे इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागाचे

Neera River Lachkod Launch | नीरा नदीची लचकेतोड सुरूच

नीरा नदीची लचकेतोड सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : नीरेची लचकेतोड सुरूच आहे. नदीमधून होत असलेल्या बेकायदेशी व बेसुमार वाळूउपशामुळे इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागाचे हाल कायम आहेत. तक्रारी केल्यानंतर केवळ लुटुपुटूची कारवाई होते. मात्र येथील बेकायदा वाळूउपसा बंद करण्याची प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येच इच्छाशक्ती नसल्याचे चित्र आहे. या उपशामुळे नदीपात्र व पर्यावरण धोक्यात
आले आहे.
नीरा नदी बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस आदी तालुक्यांना वरदायिनी ठरली आहे. नदीतील बंधारे व नदीच्या वरच्या भागातील धरणांमुळे या तालुक्यांमधील बागायती शेती बहरली आहे. मात्र या तालुक्यातील नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा वाळूउपसा होत आहे. सततच्या वाळूउपशामुळे नदीपात्राची खोलीदेखील वाढली आहे.
पाण्याचा वेग व सातत्याने नदीपात्रात जेसीबी मशीन होत असलेला वाळूउपसा यामुळे नदीपात्राच्या तळाची उलथापालथ होत आहे.
पात्राची वेगाने धूप होऊन नदीची खोली वाढत आहे. त्याचा परिणाम नदीकाठच्या भूजलपातळीवर होऊ लागला आहे. परिणामी नदीला पाणी नसल्यावर उन्हाळ््याचे चार महिने येथील शेती संकटात सापडू लागली आहे. या वाळूउपशाबाबत अनेक वेळा महसूल विभागाकडे तक्रारी करण्यात येतात. मात्र केवळ लुटुपुटूची कारवाई करून तक्रारदारांची बोळवण तर वाळूमाफियांचे लाड अधिकारीवर्ग नित्यनेमाने पुरवत आहेत. त्यामुळे वाळूमाफियांचीच दहशत नदीकाठच्या गावांना सहन करावी लागत आहे. परिणामी कारवाई होण्याअगोदरच वाळूमाफियांना टीप मिळते. त्यामुळे दररोज शेकडो ब्रास होणारा वाळूउपसा कारवाईमध्ये केवळ ३० किंवा ४० ब्रासच्यावर जात नाही. अधिकारीवर्गच जर वाळूमाफियांकडे दुर्लक्ष करीत असतील तर तक्रार कोणाकडे करायची, असा सवाल इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामस्थांनी केला आहे.

सामाजिक वनीकरणाच्या जागेत वाळूचे साठे व मुरूम उपसा

निमसाखर परिसरात नदीकाठी वनीकरण विभागाची शेकडो एकर जमीन आहे. वाळूमाफिया सामाजिक वनीकरण विभागाच्या जमिनीवर बेकायदा वाळूचे साठे करतात.
या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात बेकायदा मुरुमउपसादेखील केला जातो. नदीपात्राबरोबरच सामाजिक
वनीकरणाच्या जागेतदेखील मोठमोठाले वाळूचे ढीग दिसून येतात.

पळसमंडळ-निमसाखर बंधाऱ्याचा भराव वाढवा
या बंधाऱ्याच्या निमसाखरकडील बाजूचा मातीचा भराव वाहून गेला आहे. सध्या पावसाळादेखील सुरू आहे. मागील वर्षी धरणामधून पाणी सोडल्यानंतर नदीतील पाणी बंधाऱ्याला वळसा घालून वाहत होते. त्यामुळे बंधाऱ्यालादेखील धोका निर्माण झाला होता. बंधाऱ्याला वळसा घालून पाणी वाहिल्याने बंधाऱ्यापासून जवळपास ७० ते ८० फूट नदीकाठाची आतपर्यंत झीज झाली आहे. यामध्येच चौकीची मागील भिंत ढासळल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

बीकेबीएन
रस्त्याची दुरवस्था
इंदापूर तालुक्यातील कळंब, निमसाखर, निरवांगी, खोरोची बोराटवाडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळूउपसा होत असतो. सततच्या अवजड वाळूवाहतुकीमुळे या भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मोठमोठे खड्डे हीच येथील रस्त्यांची ओळख बनली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवण्याचे काम केले. अशी मलमपट्टी दर चार-दोन महिन्यांनी होत असते. मात्र त्यानंतरही काही दिवसांत रस्ते आपले मूळ रूप धारण करतात. अवजड वाळूवाहतुकीमुळे या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच सोलापूर, लातूर, उस्मानाबाद ते आंतरराज्य वाहतुकीच्या अनेक एसटी बसेस याच मार्गाने जातात. अरुंद रस्ते, रस्त्यावरील खड्डे, रस्त्यांवर ओढे-नाले आदींच्या ठिकाणी असणारे कमी उंचीचे पूल यामुळे हा मार्ग साक्षात् मृत्यूचा सापळा बनू पाहत आहे. वाळूवाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाळूचे कण उडतात.

धोकादायक प्रवास, पूल उभारण्याची मागणी

पळसमंडळच्या बाजूने येणारे विद्यार्थी सध्या नदीला पाणी असल्याने होडीने शाळेत येतात. नदीपात्रामध्ये वाळूमाफियांनी जागोजागी मोठमोठे खड्डे करून ठेवले आहेत. एक-एक खड्डा विहिरीच्या आकाराचा आहे. काही ठिकाणी वाळूचे मोठाले ढीग लावले आहेत. अशा धोकादायक परिस्थितीतून दररोज विद्यार्थी शाळेसाठी येत असतात. पळसमंडळ-निमसाखर बंधाऱ्यावरूनदेखील धोकादायक प्रवास करून विद्यार्थी शाळेमध्ये येत असतात. हा बंधाराच इंदापूर आणि माळशिरस तालुक्यातील ग्रामस्थांसाठी वाहतुकीचा आधार बनला आहे. पाटबंधारे विभाग बंधाऱ्यावरून वाहतुकीस परवानगी देत नाहीत. तशी परवानगी देताही येत नाही. मात्र दोन तालुक्यांतील गावांची येथील ग्रामस्थांनी अडचण समजून घेऊन पळसमंडळ-निमसाखर बंधारा परिसरात पुलाची उभारणी केल्यास हा पूल दहिवडी, शिखर शिंगणापूर, फलटण, माळशिरस, म्हसवड आदी भागांना जोडणारा इंदापूर तालुक्यातील जवळचा मार्ग ठरणार आहे.

Web Title: Neera River Lachkod Launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.