नीरा-देवघर, भाटघरमधून विसर्ग
By Admin | Updated: March 20, 2016 04:38 IST2016-03-20T04:38:43+5:302016-03-20T04:38:43+5:30
धरणग्रस्तांच्या आंदोलनाला न जुमानता पाटबंधारे खात्याने नीरा देवघर धरणातून शुक्रवारी रात्रीपासून ७५० क्युसेक्सने, तर भाटघर धरणातून शनिवारी सायंकाळी ५.३० पासून ७५० क्युसेक्सने

नीरा-देवघर, भाटघरमधून विसर्ग
भोर : धरणग्रस्तांच्या आंदोलनाला न जुमानता पाटबंधारे खात्याने नीरा देवघर धरणातून शुक्रवारी रात्रीपासून ७५० क्युसेक्सने, तर भाटघर धरणातून शनिवारी सायंकाळी ५.३० पासून ७५० क्युसेक्सने नीरा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.
भोर तालुक्यातील नीरा देवघर ३८ टक्के, तर भाटघर धरणात १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातून फलटण व बारामती तालुक्यातील शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, नीरा देवघर धरणग्रस्तांच्या मागण्या मंजूर झाल्या नसल्याने धरणग्रस्तांनी काल सकाळी १० वा. धरणावर जाऊन खाली सोडलेले पाणी बंद केले होते. मात्र, पाटबंधारे विभागाने रात्री १२ वा. धरणातून ७५० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले आहे.
वीर धरणात सध्या फक्त ७ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने वीर धरणातून बारामती व फलटण तालुक्यातील डाव्या व उजव्या कालव्याला शेतीसाठी १ एप्रिलपासून पाणी सोडण्यात येणार होते. मात्र, शेतीला कमी पडत असल्याने नीरा देवघर धरणातून काल रात्री ९ वाजता ७५० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले होते. सुमारे १ टक्का पाणी खाली गेले.
मात्र, पाणी खाली सोडलेले समजताच शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता नीरा देवघर धरणग्रस्तांच्या कोणत्याच मागण्या शासनाकडून मान्य झाल्या नसल्याने जोपर्यंत धरणग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत धरणातून पाणी खाली जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेत धरणग्रस्तांनी धरणातून नीरा नदीत पूर्व भागातील शेतीसाठी सोडलेले पाणी बंद केले होते. मात्र, पाटबंधारे विभागाने रात्री १२ वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
(वार्ताहर)