तळेगाव दाभाडे : ‘साप’ म्हटले की, माणूस खुळ्या कल्पना आणि भीतीपोटी त्याला नष्ट करतो. सापांबद्दल अनेक गैरजमज आहेत. खरे तर सर्प हा मानवजातीचा, विशेषत: शेतकऱ्यांचा जवळचा मित्र आहे. सापाची हत्या होता कामा नये, यासाठीच नागपंचमीसारख्या सणाला महत्त्व आहे. सर्प संवर्धनासाठी जनजागृतीची गरज आहे. सापाला मारू नये, असे आवाहन येथील सर्पमित्र किरण मोकाशी यांनी केले आहे. मोकाशी म्हणाले, सापाला मारू नये, हे जसे विज्ञान सांगते, तसेच पुराणातही सापाला देवता मानले आहे. त्याची पूजा करणे हा एक उपचार आहे. परंतु, सापाचा जीव वाचला पाहिजे. त्याची हत्या होता कामा नये. लोकशिक्षण व विज्ञानाच्या माध्यमातून सर्पाविषयीचे गैरसमज दूर केले गेले पाहिजेत. प्रबोधनातून शहरी व ग्रामीण भागात सापाला मारण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात लोकशिक्षणाची अधिक गरज आहे.सापाविषयी अधिक माहिती सांगताना ते म्हणाले, जगभरात सर्पाच्या ३१७१ जाती आहेत. त्यामध्ये २८० कमी अधिक विषारी साप पाहावयास मिळतात. भारतामध्ये २७०पेक्षा जास्त सापांच्या जाती आहेत. त्यातील अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ज्यामध्ये चापडा, उडता साप यांसारख्या जातींचा समावेश आहे. सापाविषयी असलेले गैरसमज व अंधश्रद्धेविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘साप डूख धरतो. सापाला सुगंध आवडतो म्हणून तो केवड्याच्या बनात राहतो, असे अनेक गैरमसज अजूनही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. (वार्ताहर)साप पकडणे, बाळगणे आहे गुन्हासापांना संरक्षण देणारा वन्यजीवन संरक्षण कायदा १९७२ पासून अस्तित्वात आला. त्यानुसार साप पकडणे अथवा बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु, या कायद्याची कितपत अंमलबजावणी होते, हा संशोधनाचा विषय ठरेल. कारण, सापाच्या कातडीपासून चपलांचे पट्टे, पर्स इत्यादी वस्तू बनविल्या जातात. त्यामुळे सापांच्या कातडीची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. शासनाने सापापासून तयार होणाऱ्या वस्तूंवर निर्यातबंदी केली आहे. परंतु, कायद्याने सर्पहत्या थांबणार नाही. त्यासाठी लोकशिक्षणाची आवश्यकता आहे.
सर्पसंवर्धनासाठी जनजागृतीची गरज
By admin | Updated: August 7, 2016 04:10 IST