जुन्नर: जुन्नरच्या शिवाई देवी यात्रेच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर शिवाई देवीच्या पुजा अभिषेकाचा कार्यक्रम सुरु असताना लातूर येथून आलेल्या शिवप्रेमी पर्यटकांवर आग्यामोहळाच्या मधमाशांनी हल्ला केला.
घाबरलेल्या या पर्यटकांनी गळ्यातल्या उपरण्यांनी झटकत, शिवाई मंदिराच्या दिशेने धाव घेतली. यावेळी मंदिराजवळ दर्शनासाठी सपत्नीक आलेलेले धर्मेंद्र कोरे यांनी पर्यटकांना पळू नका , हालचाल करू नका, उपरणी झटकू नका असे सुचवले. परंतु घाबरून पळालेल्या पर्यटकांना पुढील मार्ग बंद असल्याने माघारी फिरावे लागले. त्यावेळी येथे असलेल्या धर्मेंद्र कोरे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. दरम्यान शिवाई देवीचे पुजारी सोपान दुराफे यांनी कोरे यांना बचावासाठी चादर दिली. त्या चादरीने त्यांनी संपुर्ण शरीर झाकल्याने, माशा हळूहळू तेथून दूर गेल्या.
तत्पूर्वी तेथे देवीची पालखी घेऊन आलेले पालखीचे भोई संजय भोकरे यांनी कोरे यांच्या तोंडावर, मानेवर मधमाशांचा डंख झालेले जवळपास १७० काटे कुशलतेने काढले. जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य रुपेश जगताप, राजकुमार चव्हाण, सुजल बिडवई, ओम बिडवई तसेच पुरातत्व खात्याचे कर्मचारी गोकुळ दाभाडे यांनी कोरे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.