जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व
By Admin | Updated: February 24, 2017 02:12 IST2017-02-24T02:12:53+5:302017-02-24T02:12:53+5:30
जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ७ पैकी ४ जागा जिंकत मागील

जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व
नितीन ससाणे / जुन्नर
जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ७ पैकी ४ जागा जिंकत मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिकच्या दोन जागा मिळवून मुसंडी मारली. तर मागील निवडणुकीत ५ जागा मिळविणाऱ्या शिवसेनेला या वेळी ३ जागा मिळाल्याने २ जागांची घट सोसावी लागली.
शिवसेनेचे प्रमुख उमेदवार निवडून आले. परंतु जागांच्या तुलनेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार धक्का मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ उमेदवार पांडुरंग पवार, शरद लेंडे यांच्या बरोबरीने मोहित ढमाले, अंकुश आमले या नवीन उमेदवारांनीही विजय मिळविला. तर चमत्काराची भाषा करणाऱ्या काँग्रेस, भाजपा व आमदार शरद सोनवणे यांच्या आपला माणूस आपली आघाडीला एकही जागा मिळाली नाही. जिल्हा परिषद निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे आळे पिंपळवंडी गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शरद लेंडे यांचा अवघ्या १ मताने मिळविलेला विजय होय. या गटातील निकालाने मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतमोजणी अधिकाऱ्यांची व मतदारांचीही परीक्षा पहिली. तर मतदारांनी भारतीय जनता पक्ष, आमदार शरद सोनवणे यांची आपला माणूस आपली आघाडीचा पुरता सफाया केला.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व बाजार समितीचे माजी संचालक कोल्हे यांनी नारायणगाव जिल्हा परिषद गटातील पराभवाचा नैतिक जवाबदारी स्वीकारून राजीनामा जिल्हा अध्यक्षांकडे पाठविला आहे.
शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके यांनी ३९८६ मतांनी नारायणगाव वारूळवाडी गटातून एकहाती विजय मिळविला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी राजुरी बेल्हे गटातून ४५१९ मते मिळवून विजय मिळविला. पाडळी-निरगुडे गटात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांनी १७५५ मतांनी निवडून आले. पिंपळगाव जोगा-डिंगोरे गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश आमले यांनी बाजी मारली. ओतूर पिंपरी पेंढार गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहित ढमाले यानी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे खाते खोलले. सावरगाव तर्फे हवेली-धालेवाडी गटात शिवसेनेचे गुलाबराव पारखे यांनी १७७७ मतांनी चुरशीच्या लढतीत विजय मिळविला. तालुक्यात सर्वांचे लक्ष लागलेल्या आळे पिंपळवंडी गटात आमदार शरद सोनवणे यांचे बंधू शशिकांत सोनवणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सोनवणे यांनी प्रतिष्ठेची केलेल्या या लढतीत शशिकांत सोनवणे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा राजश्री बोरकर नारायणगाव वारुळवाडी गटातून पराभूत झाल्या. राजुरी बेल्हे गटात पंचायत समिती माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ यांनाही मतदारांनी नाकारले. तालुक्याच्या पूर्व भागातील लक्षवेधी ठरलेल्या राजुरी बेल्हे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वल्लभ शेळके यांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी केली होती. त्यांचाही पराभव झाला. त्यांना ७३५७ मते मिळाली. तालुका पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने पुन्हा एकदा १४ पैकी ७ जागा मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागांवर विजय मिळाला. तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. आमदार शरद सोनवणे यांची आपला माणूस आपली आघाडीला तसेच भाजपाला पंचायत समितीत एकही जागा मिळाली नाही. शिवसेनेला बहुमत मिळविण्यासाठी ८ जागांची गरज आहे. मागील निवडणुकीप्रमाणे काँग्रेसच्या एका उमेदवाराचा पाठिंबा मिळाल्यास शिवसेनेला सत्तास्थापन करणे शक्य होईल. त्यामुळे काँग्रेसच्या हातात पंचायत समिती सभापतिपदाची किल्ली राहणार आहे. पिंपळगाव जोगा गणात शिवसेनेच्या मंगल उंडे, डिंगोरे गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा बनकर विजयी झाले. ओतूर गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल तांबे विजयी झाले, तर शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख संभाजी तांबे यांचे पुत्र लोकेश तांबे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पिंपरीपेंढार गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रंजना काळे विजयी झाल्या. आळे गणात शिवसेनेचे जीवन शिंदे व पिंपळवंडी गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे श्याम माळी यांनी बाजी मारली. राजुरी गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारिका औटी यांनी तर बेल्हा गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनघा घोडके विजयी झाल्या. नारायणगाव गणात शिवसेनेच्या अर्चना माळवदकर यांनी तर वारुळवाडी गणात शिवसेनेचे रमेश खुडे विजयी झाले. धालेवाडी तर्फे हवेली गणातून काँग्रेसचे एकमेव उदय भोपे तर सावरगाव गणातून शिवसेनेच्या ललिता चव्हाण विजयी झाल्या. आदिवासी भागातील पाडळी गणात शिवसेनेचे काळू गागरे तर निरगुडे गणातून शिवसेनेचे दिलीप गांजाळे यांनी बाजी मारली.