थेऊर-लोणी काळभोर गटात राष्ट्रवादीच्या बंडखोरांची आघाडी
By Admin | Updated: February 14, 2017 01:40 IST2017-02-14T01:40:37+5:302017-02-14T01:40:37+5:30
थेऊर-लोणी काळभोर गट व गणांत राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांना डावलले गेल्याने त्यांनी स्थानिक पातळीवर आघाडीच्या माध्यमातून बंडाचे निशान

थेऊर-लोणी काळभोर गटात राष्ट्रवादीच्या बंडखोरांची आघाडी
लोणी काळभोर : थेऊर-लोणी काळभोर गट व गणांत राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांना डावलले गेल्याने त्यांनी स्थानिक पातळीवर आघाडीच्या माध्यमातून बंडाचे निशान फडकवले आहे. या गट व गणांमध्ये भाजपाने आपले उमेदवार न दिल्याने त्यांची भूमिका अद्याप गुलदस्तात असून, त्याअंतर्गत ते कोणास मदत करणार, यांवर येथे विजयी कोण होणार, हे ठरणार आहे. तसेच, शिवसेनेने आपले उमेदवार उभे केल्याने राष्ट्रवादी व आघाडी समोर कडवे आव्हान असून, या ठिकाणी चौरंगी लढत होत आहे.
राष्ट्रवादी काँॅग्रेसच्या वतीने या गटात राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी यांच्या पत्नी सुनीता गवळी यांना, तर थेऊर गणात माजी ग्रामपंचायत सदस्य विलास कुंजीर यांच्या पत्नी कावेरी यांना, तर लोणी काळभोर गणात माजी उपसरपंच प्रशांत काळभोर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने गटात रेश्मा बोराळे, थेऊर गणात सुनीता भैरवकर, तर लोणी काळभोर गणात उपतालुकाप्रमुख रमेश भोसले हे निवडणुकीस सामोरे जात आहेत.
राष्ट्रवादीकडून इच्छुक, परंतु तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या गटाने आघाडीतर्फे माजी सरपंच भोलेनाथ शेलार यांच्या मातोश्री सुनंदा शेलार, थेऊर गणात माजी उपसरपंच भरत कुंजीर यांच्या पत्नी जयश्री कुंजीर, तर लोणी काळभोर गणात माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर यांचे पुतणे युगंधर काळभोर यांनी आघाडी करून बंडाचे निशान कायम ठेवले आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच बंडखोरांच्या आघाडीमुळे मोठी चुरस होणार आहे. राष्ट्रवादीला विजयासाठी झगडावे लागणार असल्याची चिन्हे सध्यातरी दिसत आहेत.
काँग्रेसच्या वतीने गटात सोनाली जवळकर यांची उमेदवारी कायम आहे. लोणी काळभोर गणातून काँग्रेसची अधिकृत उमेदवारी घेतलेल्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्याने व थेऊर गणात उमेदवारच न
दिल्याने त्यांची भूमिकाही गुलदस्तातच आहे. (वार्ताहर)
हवेलीत सर्वाधिक १८९ उमेदवार रिंगणात
लोणी काळभोर : आज अर्जमाघारीचा शेवटचा दिवस असल्याने शिवाजीनगर येथील गोदाम आवारात मोठी गर्दी झाली होती. हवेली निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार हवेली तालुक्यातील १३ जिल्हा परिषद गटांसाठी ११५, तर पंचायत समितीच्या २६ गणांसाठी २१८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी जिल्हा परिषद गटांत ५२ जणांनी, तर पंचायत समिती गणांत ९२ जणांनी माघार घेतल्याने उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात ६३ व १२६ उतरले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पेरणे, थेऊर, कोंढवे-धावडे या तीन गणांत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने या गणांतील उमेदवारांची माघार व त्यांना चिन्हवाटप १५ फेब्रुवारी रोजी ११ ते ३ या वेळेत होणार आहे.
हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी भरलेल्या अनेक उमेदवारांनी ‘अभी नही तो कभी नही’ असा निर्धार करून आजपर्यंत ज्या पक्षाचे काम ईमाने-इतबारे केले त्यांना उमेदवारी नाकारल्याने ‘आता रडायचे नाही, तर लढायचेच’ माघार अजिबात नाही, हे धोरण ठरवले असल्याने अनेक गट व गणांत अधिकृत पक्षांच्या उमेदवारांना अपक्षांचे ग्रहण लागले आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकांमध्ये अनेक इच्छुकांना आश्वासने देऊन नंतर मात्र त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली.
या वेळीदेखील तसेच होण्याची शक्यता गृहीत धरून अनेकजणांनी अर्ज माघारी घेणार नसल्याचे ठामपणे सांगितले. अनेकांनी पक्षासमवेत स्वत:ची छबी जिवंत ठेवण्यासाठी गेली पाच वर्षे सातत्याने अनेक उपक्रम राबवलेले आहेत. त्यावर केलेल्या खर्चावर पाणी सोडायचे का, असाही प्रश्न उपस्थित करताना दिसत होते. त्यामुळे या निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा मिळवतो, याकडे सर्वच राजकीय पक्ष, उमेदवार आणि राजकीय अभ्यासकांचे लक्ष लागले आहे. ( वार्ताहर )