पुण्यातून राष्ट्रवादी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना प्रतीकात्मक राखी पाठवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 18:54 IST2022-08-10T18:53:50+5:302022-08-10T18:54:00+5:30
अनेक समस्यांची आठवण करून देणाऱ्या राख्या यांना पाठविण्यात आली असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले

पुण्यातून राष्ट्रवादी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना प्रतीकात्मक राखी पाठवणार
पुणे : राखी म्हणजे रक्षण करण्याचे वचन. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागरिकांप्रति असलेल्या या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर शासकीय योजना सेलच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त राखी पाठविण्यात आली आहे. सिटीपोस्टातून पोस्टाद्वारे ह्या राख्या पाठविण्यात आल्या असून यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख, वेणू शिंदे, मृणालिणी वाणी, मीना मोरे व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
''महागाईचा भस्मासुर नागरिकांवर हल्ला करतोय. बेरोजगारीच्या राक्षसाने तरुणांचे जीवन उध्वस्त केले आहे.इंधन दरवाढीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलेंडर दरवाढ महिलांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्या असे प्रश्न आ वासून उभे आहेत. मात्र सरकार शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून नागरिकांचा आवाज दाबत आहे. देशाचे पालक म्हणून या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी पंतप्रधान भावनेला हात घालून समाजात दुही पसरविणाऱ्या अनेकांना समर्थन देत आहेत. या आणि अनेक समस्यांची आठवण करून देणारी राखी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना राखी पाठविण्यात आली असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.''