मुळशी पंचायत समितीवर पुन्हा राष्ट्रवादीचे वर्चस्व

By Admin | Updated: February 24, 2017 02:15 IST2017-02-24T02:15:46+5:302017-02-24T02:15:46+5:30

मुळशी पंचायत समितीच्या ६ पैकी ४ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व

NCP dominates again on Mulshi Panchayat Samiti | मुळशी पंचायत समितीवर पुन्हा राष्ट्रवादीचे वर्चस्व

मुळशी पंचायत समितीवर पुन्हा राष्ट्रवादीचे वर्चस्व

पौड : मुळशी पंचायत समितीच्या ६ पैकी ४ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले, तर जि.प.गटात तीन पैकी १ जागा सेनेकडे, तर २ जागा राष्ट्रवादीकडे राहिल्या आहेत.
कासार आंबोली येथील सैनिकी शाळेत सकाळी बरोबर १० वाजता एकूण २८ टेबलवर सर्व गट गणाची एकाचवेळी सुरूझालेली मतमोजणी बरोबर ११.३० वाजता संपली.
२०१२ च्या निवडणुकीत पंचायत समितीत सहा पैकी ५ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार, तर १ जागा काँग्रेस पक्षाकडे होती व जि.प. ३ गटांपैकी २ जागा राष्ट्रवादी, तर १ जागा सेनेकडे होती.
या वेळी शिवसेनेने पंचायत समितीत मुसंडी मारत १ जागा अधिक घेतली, तर जि.प.गटात १ जागा कायम ठेऊन आपला आलेख उंचावता ठेवला.
पौड-कासार-आंबोली गटात अनुसूचित जमातीचा शिवसेनेचा सर्वांत तरुण उमेदवार असलेला सागर काटकर याने सुरवातीपासून आघाडी घेत आपल्या विजयाचा मार्ग सुकर केला. तर त्यापाठोपाठ बावधन -पिरंगुट गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार शारदा ननावरे यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली, परंतु अंतिम निकालात राष्ट्रवादीच्या अंजली कांबळे यांनी २१० मतांची आघाडी घेत बाजी मारली.
विशेष म्हणजे सुरवातीला शिवसेनेच्या शारदा ननावरे याच विजयी झाल्याचे सर्वत्र कळाले व बाहेर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंतिम निकालात अंजली कांबळे यांना विजयी घोषित केल्याने या आकस्मिक निकालाने तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पिरंगुट गणात आजी-माजी सभापतींच्या सौभाग्यवतींच्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या राधिका कोंढरे यांनी विजयश्री संपादन केली. भाजपा, मनसे व अपक्षांना आपले खातेही खोलता आले नाही. (वार्ताहर)

Web Title: NCP dominates again on Mulshi Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.