नाझीरकरच्या ३७ बेनामी कंपन्या, ८२ कोटींची बेनामी मालमत्ता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:18+5:302021-04-01T04:12:18+5:30
नगर रचना विभागात कामाला : भ्रष्टाचाराचा कळस लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ...

नाझीरकरच्या ३७ बेनामी कंपन्या, ८२ कोटींची बेनामी मालमत्ता?
नगर रचना विभागात कामाला : भ्रष्टाचाराचा कळस
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेला नगर रचना विभागाचा निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर याचे कारनामे उघड होऊ लागले आहेत. सासऱ्याच्या नावाखाली त्याने ३७ कंपन्या स्थापन केल्या असून, त्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. तसेच आतापर्यंतच्या तपासात ८२ कोटींची बेनामी मालमत्ता उघड झाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हनुमंत नाझीरकरला मंगळवारी (दि. ३०) अटक केली. बुधवारी (दि. ३१) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अधिक तपासासाठी ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. याप्रकरणी नाझीरकरसह एकूण ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हनुमंत नाझीरकर, त्याची पत्नी संगीता नाझीरकर, मुलगी गीतांजली नाझीरकर, मुलगा भास्कर नाझीरकर (सर्व रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरूड), अनिल शंकर शिपकुले (रा. शिरवली, ता़ बारामती), बाळासाहेब विठ्ठल घनवट (रा. शिरवली, ता़ बारामती), अॅड विजयसिंह भगवान धुमाळ (वय ७४, रा. बारामती), राहुल शिवाजी खोमणे (वय ३१, रा. शिरवली, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राहुल खोमणेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
उत्पन्नापेक्षा अधिक २ कोटी ८५ लाख रुपयांची मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षी १८ जून २०२० रोजी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गेल्या ७ -८ महिन्यात केलेल्या तपासात ज्ञात उत्पनापेक्षा ८२ कोटी ३४ लाख ३८ हजार ६८० रुपयांची जादा मालमत्ता नाझीरकर, तसेच त्याचे सासरे गुलाब धावडे, पत्नी संगिता, मुलगी गीतांजली व मुलगा भास्कर यांच्या नावाने बाळगून असल्याचे निष्पन्न झाले. ही एकूण उत्पन्नाच्या ११६२ टक्के अधिक आहे.