राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मराठी चित्रपटांचा दुर्मीळ खजिना प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:10 IST2021-03-27T04:10:59+5:302021-03-27T04:10:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘ ताई तेलीण’ आणि ‘पवनाकाठचा धोंडी’ या मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाती गाजलेल्या चित्रपटांच्या अमूल्य ठेव्यांची ...

National Film Museum receives rare treasure of Marathi films | राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मराठी चित्रपटांचा दुर्मीळ खजिना प्राप्त

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मराठी चित्रपटांचा दुर्मीळ खजिना प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘ ताई तेलीण’ आणि ‘पवनाकाठचा धोंडी’ या मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाती गाजलेल्या चित्रपटांच्या अमूल्य ठेव्यांची भर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात पडली आहे. त्यामध्ये १९५० ते १९७० या दोन दशकाच्या काळातील प्राप्त झालेल्या एकूण ८९ चित्रपटांमध्ये मराठीबरोबरच काही हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे.

‘ताई तेलीण’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती आर्यन फिल्म कंपनीने केली होती आणि त्या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री शांता आपटे, सुधा आपटे, नलिनी बोरकर आणि झुंजारराव पवार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन के. पी. भावे आणि अंतो नरहरी यांनी केले होते. ‘पवनाकाठचा धोंडी’ या चित्रपटाची फिल्मही मिळाली आहे. अनंत ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला १९६६ साली सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला होता. अनंत ठाकूर यांनी हा दिग्दर्शित केलेला पहिलाच मराठी चित्रपट होता. या चित्रपटाची निर्मिती श्री महालक्ष्मी चित्र या बॅनरखाली गायिका उषा मंगेशकर यांनी केली होती. तर चित्रपटात चंद्रकांत, सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. विशेष म्हणजे अभिनेते चंद्रकांत आणि सूर्यकांत या दोन सख्ख्या भावांनी या चित्रपटात सख्ख्या भावाचीच भूमिका केली होती हा एक दुर्मिळ योगायोग होता. सुप्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या ‘पवनाकाठचा धोंडी’ याच कादंबरीवरून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.

या दुर्मीळ चित्रपटांच्या खजिन्यात देव पावला (१९५०), ‘भाऊबीज’(१९५५), ‘अंतरीचा दिवा’ (१९६०), ‘सुभद्राहरण’ (१९६३), ‘बारा वर्षे, सहा महिने तीन दिवस, (१९६७), धाकटी बहीण, (१९७०), ’पुढारी’(१९७२), ‘बन्याबापू’ (१९७७), ‘दीड शहाणे’ (१९७९), ‘राखणदार’ ( १९८२ ) आणि ’कळत-नकळत’ (१९८९) आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचा ‘साधी माणसं’ (१९६५), राजमान्य राजश्री (१९५९), ‘एकटी’ (१९६८) अशा विविध गाजलेल्या यामध्ये चित्रपटांचाही समावेश आहे. मराठीबरोबरच कृष्णधवल रंगातील ‘नॉटी बॉय’ (१९६२), मोहन कुमार यांचा ‘अमन’ (१९६७ ), गेस्ट हाऊस (१९५९), ताजमहाल (१९६३), शिकारी (१९६३), दो यार (१९७२) आदी चित्रपटांची देखील भर पडली आहे.

-----------------------------------------------

‘ताई तेलीण’ व ‘पवनाकाठचा धोंडी’ या चित्रपटाच्या फिल्मही राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे प्राप्त झाल्यामुळे त्याचा दुहेरी आनंद होत आहे. संबंधित चित्रपट निर्माते, वितरक, वैयक्तिक संग्राहक यांनी आपल्याकडील दुर्मीळ फिल्म्स तसेच चित्रपटविषयक साहित्य आणि अन्य माहिती जतन करून ठेवण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द कराव्यात.

- प्रकाश मगदूम, संचालक राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय

------------------------------------------------------------

Web Title: National Film Museum receives rare treasure of Marathi films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.