नानासाहेब शितोळे यांचे निधन

By Admin | Updated: July 19, 2014 03:29 IST2014-07-19T03:29:25+5:302014-07-19T03:29:25+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महापौर अरविंद ऊर्फनानासाहेब गोपाळराव शितोळे (वय ७५) यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले

Nanasaheb Shitole passes away | नानासाहेब शितोळे यांचे निधन

नानासाहेब शितोळे यांचे निधन

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महापौर अरविंद ऊर्फनानासाहेब गोपाळराव शितोळे (वय ७५) यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि महापालिकेच्या राजकारणावर पकड असणारे हे व्यक्तिमत्त्व होते.
शितोळे यांचे जुन्या सांगवीत घर आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांना छातीत दुखू लागल्याने औंध येथील खासगी रु ग्णालयात हलविले. उपचार सुरू असतानाच दुपारी एकच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास सांगवीतील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुलगे आणि मुलगी असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अतुल शितोळे यांचे ते वडील होतं.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात शितोळे यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच बडोद्याच्या महाराजांच्या दरबारी शिताळेंचे पूर्वज सेवेस होते. राजघराण्याचा वारसाही त्यांच्याकडे असल्याने लवळे, सांगवी अशी अनेक गावे वतनदारीही या परिवाराला मिळालेली होती. त्यामुळे सरदार शितोळे म्हणूनही त्यांना ओळखले जात असे. कबड्डीपटू म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांनी विशाल सह्याद्रीतून पत्रकारिताही केली होती.
१९८६, १९९२, १९९७ कालखंडात नानासाहेब शितोळे यांनी नगरसेवक म्हणून काम पाहिले. महापौर भिकू वाघेरे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर म्हणजे १९८७-८८ मध्ये महापौरपद म्हणून निवड झाली. शहराचे तिसरे महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. साडेआठ महिन्यांचा कालखंड त्यांना मिळाला. त्यांच्या कालखंडात सांगवी स्पायसर रस्ता, दापोडी-सांगवी पूल यांसह अनेक महत्त्वाकांशी प्रकल्प राबविले गेले. त्यांनी सत्तारूढ पक्षनेते म्हणूनही काम पाहिले.
१९९२ नंतर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात अजित पवार यांनी प्रवेश केला. त्यावेळी प्रा. रामकृष्ण मोरे व पवार या दोन्ही नेत्यांमध्ये तसेच दोन्ही गटांमध्ये समन्वय घडविण्याची भूमिका त्यांनी पेलली होती.दहा वर्षाच्या कालखंडात ते सांगतील तो महापौर, उपमहापौर, पक्षनेता, विविध समित्यांचा सभापती होत असे. त्यामुळे सूत्रधार म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आज राजकारणात महत्त्वाची पदे भूषवित आहेत. पीएमटीचे अध्यक्ष, नगरसेवक, महापौर, जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष व कबड्डी महासंघाचे उपाध्यक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशी विविध पदे भूषविली. (प्रतिनिधी)

Web Title: Nanasaheb Shitole passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.