माझं पुणं क्रीडाक्षेत्रातही स्मार्ट व्हावं - चंदू बोर्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 02:36 AM2018-04-05T02:36:22+5:302018-04-05T02:36:22+5:30

आपल्या शहरासोबतच वाढण्याचं भाग्य मला लाभलं. मोठा भाऊ बेंजामिनच्या मागे-मागे यंग मेन्स ख्रिश्चन्स असोसिएशन, अर्थात वायएमसीएच्या मैदानावर जाणारं लहान पोर ते वयाच्या ८३व्या वर्षापर्यंत आयुष्याच्या विविध टप्प्यांप्रमाणे या शहराची वाटचाल मी जवळून बघत आहे. काळाच्या गरजेनुसार माझ्या पुण्यात अनेक बरेवाईट बदल झाले असले, तरी मी या शहराच्या आकंठ प्रेमात आहे.

My Pune should be smart even in the sports field - Chandu Borde | माझं पुणं क्रीडाक्षेत्रातही स्मार्ट व्हावं - चंदू बोर्डे

माझं पुणं क्रीडाक्षेत्रातही स्मार्ट व्हावं - चंदू बोर्डे

Next

आपल्या शहरासोबतच वाढण्याचं भाग्य मला लाभलं. मोठा भाऊ बेंजामिनच्या मागे-मागे यंग मेन्स ख्रिश्चन्स असोसिएशन, अर्थात वायएमसीएच्या मैदानावर जाणारं लहान पोर ते वयाच्या ८३व्या वर्षापर्यंत आयुष्याच्या विविध टप्प्यांप्रमाणे या शहराची वाटचाल मी जवळून बघत आहे. काळाच्या गरजेनुसार माझ्या पुण्यात अनेक बरेवाईट बदल झाले असले, तरी मी या शहराच्या आकंठ प्रेमात आहे.
वायएमसीएवर मी खेळाडू म्हणून घडलो. मला चांगलं आठवतं... तिथे मैदानावर खेळण्यासोबतच परिसरात पतंग उडवणं, सूरपारंब्या खेळणं, चिंचा, शिंदोडे दगडानं नेम धरून पाडणं... यासारखे उद्योग चालायचे. हे मैदान समतल नसल्यानं क्षेत्ररक्षण करताना जास्त मेहनत घ्यावी लागायची. या समस्येला संधीत रूपांतरित केल्यानं माझे रिफ्लेक्सेस परफेक्ट झाले. मला ‘पँथर’ ही उपाधी मिळण्यामागे हे कारण आहे. सरावानंतर शेजारील चर्चच्या दिशेनं तोंड करून ‘मला चांगला क्रिकेटपटू होऊ दे,’ अशी प्रार्थना करायचो. प्रयत्नांना प्रार्थनेची जोड लाभल्यानं कसोटीपटू, कर्णधार, संघव्यवस्थापक निवड समिती प्रमुख अशा विविध पातळ्यांवर स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली, अशी माझी भावना आहे.
क्रिकेटचा विचार करता, ‘टेस्ट ईज बेस्ट’ आहे. आयपीएलनं क्रिकेटला अधिक लोकप्रिय आणि आर्थिकदृष्ट्या श्रीमंत केलं असलं, तरी कसोटी क्रिकेट हेच खरं क्रिकेट आहे. बेसिक्सचा कस तिथं लागतो. अर्थात, टष्ट्वेंटी-२० फॉरमॅटमुळे कसोटी क्रिकेट अधिक वेगवान झालंय, हेही मान्य करायला हवं.
पुण्यनगरीत क्रीडा संस्कृती रुजवण्यात अनेक क्लबचं योगदान नि:संशय मोलाचं आहे. भारतीय आॅलिम्पिकची चळवळ इथूनच रुजली. आताही अनेक क्लब पुण्यात क्रीडा संस्कृतीच्या अधिकाधिक विकासात मोठं योगदान देत आहेत. सुविधा, मार्गदर्शन आणि शिस्त ही या क्लबची वैशिष्ट्यं सांगता येतील. विविध खेळांतील अनेक माजी खेळाडू या क्लबचे सदस्य आहेत. शिवाय, ते युवा खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक असतात. याचा विशेष फायदा नव्या दमाच्या खेळाडूंना होतो.
आधीपासूनच पुणं हे खेळांसाठी पूरक शहर आहे. पूर्वी पुण्याचं वातावरण खेळ व खेळाडूंसाठी आदर्शवत होतं. नंतर पुणं गजबजलं. याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर झाला. असं असलं, तरी इतर शहरांपेक्षा पुणं आजही खेळांसाठी सरस आहे.
आमच्या काळात सुविधा अपुऱ्या होत्या; मात्र मैदानं भरपूर होती. आता संपन्नता आल्यावर हे चित्र नेमकं उलट झालंय.आता सुविधा भरपूर नि मैदानं कमी झालीयत. २००८च्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं म्हाळुंगे-बालेवाडी परिसरात सोयीसुविधायुक्त शिवछत्रपती क्रीडासंकुल निर्माण करण्यात आलं; पण त्यानंतरच्या १० वर्षांत काय? या संकुलासारखी संकुलं शहराच्या सर्व दिशांना निर्माण व्हायला हवीत. तिथं अद्ययावत सुविधांसह योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्यास आपल्या शहराचं क्रीडावैभव भरभराटीला येईल.
सध्या केंद्र सरकार ‘स्मार्ट सिटी’ हा उपक्रम राबवत आहे. पुण्याचा त्यात असलेला समावेश ही खचीतच आनंदाची गोष्ट आहे. पुणं स्मार्ट होताना ते क्रीडाक्षेत्रातही स्मार्ट व्हावं, यासाठी शासन-प्रशासन स्तरावर योग्य ते प्रयत्न व्हायला हवेत. इथल्या जास्तीत जास्त खेळाडूंनी आपल्या शहरासोबतच देशाचं नाव जगात उंचवावं, अशी पुणेकर आणि एक खेळाडू म्हणून अपेक्षा आहे. ( शब्दांकन : अमोल मचाले )
 

Web Title: My Pune should be smart even in the sports field - Chandu Borde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.