पुणे : केवळ राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. मी जर यात दोषी आढळलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, अशा आशयाचा वाल्मीक कराड याने शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी सीआयडी पोलिसांनी मोठी कारवाई करीत सर्व आरोपींची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात वाल्मीक कराड हे ‘मास्टरमाइंड’ असल्याचा आरोप होत आहे. सीआयडीची पथके गेल्या पंधरा दिवसांपासून वाल्मीक याचा शोध घेत होती. परंतु त्याचा ठावठिकाणा कळत नव्हता. कराड याचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होते, त्यानंतर त्याचा फोन बंद येत होता. तो त्याच्या आकांसोबत टचमध्ये असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला होता.दरम्यान, कराड याने शरण जाण्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला. त्यात त्याने ‘मी वाल्मीक कराड. केज पोलिस स्टेशनला माझ्याविरुद्ध खोटी खंडणीची केस दाखल झाली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असतानाही मी पुण्याच्या सीआयडी पोलिसांसमोर शरण येत आहे. संतोष भैय्या देशमुख यांचे जे कुणी मारेकरी आहेत, त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. केवळ राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. मी जर यात दोषी आढळलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार,’ असल्याचे त्याने व्हिडीओमध्ये नमूद केले आहे.