शिवरायांच्या विचारांचा आदर्श देणारे संग्रहालय उभारणार
By Admin | Updated: January 20, 2015 00:58 IST2015-01-20T00:58:00+5:302015-01-20T00:58:00+5:30
राज्याभिषेक सोहळ्याला देशातील सात प्रमुख नद्यांचे पूजन करून छत्रपती शिवाजीमहाराज यांनी देशाच्या एकतेचा विचार पहिल्यांदा मांडला.

शिवरायांच्या विचारांचा आदर्श देणारे संग्रहालय उभारणार
पुणे : राज्याभिषेक सोहळ्याला देशातील सात प्रमुख नद्यांचे पूजन करून छत्रपती शिवाजीमहाराज यांनी देशाच्या एकतेचा विचार पहिल्यांदा मांडला. त्यांचे मातृप्रेम, मातृभूमीप्रेम या सगळ्यांचा तरुणांनी आदर्श घ्यायला हवा. यासाठी शिवरायांच्या विचारांचा आदर्श देणारे भव्य संग्रहालय उभारण्याचा मानस असल्याचे ‘एशियन हेरिटेज फाउंडेशन’चे संस्थापक-अध्यक्ष पद्मभूषण राजीव सेठी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
भारतीय उपखंडातीतील सांस्कृतिक वारशांच्या जतनासाठी काम करत असलेले सेठी सध्या शिवरायांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी महाराष्ट्रातील विविध भागांना भेट देत आहेत.
पुण्यात भरलेल्या पूर्वा दर्डा-कोठारी आणि हर्निश सेठ यांच्या इंट्रिया प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’चे चेअरमन, खासदार विजय दर्डा यांच्याशीही याबाबत त्यांची सविस्तर चर्चा झाली. शिवरायांच्या अनोख्या स्मारकाची अभिनव कल्पना घेऊन काम करीत असलेल्या सेठी यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
सेठी म्हणाले, ‘‘ शिवकालाची आठवण करून देणारे पुतळे, वस्तू या स्मारकात असतीलच; पण त्यापेक्षाही आजच्या पिढीला शिवरायांचे क्रांतिकारी विचार जे आजच्या काळाशीही सुसंगत आहेत, त्यांची माहिती या संग्रहालयातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आज शिवरायांचे नाव मतांसाठी वापरले जाते. परंतु, त्यांच्या विचारांची फारशी माहिती तरुणांना नाही. त्यांनी आयुष्यभर पाळलेली मूल्ये, अंगीकारलेली तत्त्वे नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजेत. त्यामुळेच हे स्मारक केवळ राज्य किंवा देशपातळीवर नसेल, तर त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर करणार आहे. शिवरायांनी दिलेला एकतेचा संदेश चिरंतन ठेवण्यासाठी देशातील वेगवेगळ्या नद्यांमधील पाणी एकत्र करून कारंजाची उभारणी केली जाणार आहे.
आर्थिक, सामाजिक विकास साधताना आपली अस्मिताही जपली पाहिजे सांगताना सेठी म्हणाले, ‘‘भूतकाळाचे भविष्याशी काय नाते आहे हे समजून घेतले पाहिजे. देशाच्या विकासात सांस्कृतिक वारशाचाही विसर पडता कामा नये. त्यामुळे आजच्या काळात शिवरायांचा विसर पडला तर आपण आपलेच फार मोठे नुकसान करण्यासारखे आहे.
सेठी म्हणाले, ‘‘भारतात सध्या ज्ञानाधिष्ठित उद्योग (नॉलेज इंडस्ट्री) वाढत आहेत. परकीय ज्ञान आत्मसात करून आपण त्याद्वारे विकास साधू पाहत आहोत. आयटी, बीपीओ वाढत आहेत. परंतु, उद्या चीन, आफ्रिकेतील देशही हे क्षेत्र पादाक्रांत करू शकतात. त्यामुळे आपले पारंपरिक ज्ञान, कलांची शक्ती आपण ओळखायला हवी. यासाठी विद्यापीठातील अभ्यासक्रमांत लोककला आणि लोककारागिरीचा समावेश करायला हवा. कारागीर कदाचित रुढार्थाने शिक्षण घेतलेले नसतील, तरीही त्यांना शिक्षक म्हणून नेमायला हवे. तरच ही कला आपण जिवंत ठेवू शकतो. देशाच्या मातीचा सुगंध असलेले उद्योगच आपली खरी शक्ती असतील.’’ (प्रतिनिधी)
४देशातील लोककलावंत आणि कारागिरांसाठी विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या सेठी यांनी यााबाबतच्या शासकीय धोरणावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘देशातील लोककलावंतांची संख्या आणि स्थिती याबाबतची कोणतीही आकडेवारी आजपर्यंत शासनाने तयार केलेली नाही. त्यामुळे देशाचे वैभव आणि शक्ती असलेली कारागिरी नामशेष होण्याची भीती आहे. कलेच्या माध्यमातून आपली उपजीविका करणाऱ्या डोंबाऱ्यासारख्या कलाकारांना कायद्याने थेट भिकारी म्हटले आहे.
४याच डोंबाऱ्यासारख्या कलाकारांना जिम्नॅशियमचे शिक्षण दिले तर ते भारतासाठी सुवर्णपदकही आणू शकतील. विविध कला जोपासणारे असे अनेक कलाकार गावागावांत आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय केले जाईल, याचा विचार होणे आवश्यक आहे.’’