पुणे : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात बालगंधर्व पुरस्कार हा चांगल्या कलाकाराला प्रदान केला जातो. पुणे महापालिकेतर्फे हा पुरस्कार दिला जातो. पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून यापूर्वीचे पुरस्कार प्रदान केले नसून, नवीन जाहीरही केले नाहीत. त्यामुळे कलाकारांची थट्टा केली जात असल्याची चर्चा होत आहे.पुणे महापालिकेच्या वतीने २०२० व २०२१ सालचा पुरस्कार जाहीर करूनही पुरस्कार प्रदान केला नाही. याबाबत पुणे मनपा आयुक्त यांना पुरस्कार दिलेल्या कलाकारांना पुरस्कार प्रदान करावा या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नेते बाबू वागसकर, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली शहर सचिव रमेश जाधव, रवी सहाणे, मनविसेचे सारंग सराफ, श्रीनिवास दिसले यांनी दिले. डॉ. भोसले यांनी पुरस्कार समारंभ आयोजित करून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्याचे व पुरस्कार प्राप्त झालेल्या कलाकारांना कळविण्याचे आश्वासन दिले.नटसम्राट बालगंधर्व यांच्या जन्मदिनानिमित्त पुणे महापालिकेतर्फे दरवर्षी ज्येष्ठ कलाकारास मानाचा बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबर नाट्य क्षेत्रातील पाच कलाकारांचा सत्कार केला जातो. तसेच महापालिका इतर विविध १३ पुरस्कार दिले जातात. कोरोना काळापासून पुरस्कार देणे बंद झाले होते. त्यानंतर प्रशासनाने पुरस्कार देण्याबाबत रुची दाखवली नाही.संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री निर्मला गोगटे यांना २०२० आणि शास्त्रीय गायिका डॉ. रेवा नातू यांना २०२१ सालचा महापालिकेच्या वतीने बालगंधर्व पुरस्कार जाहीर होऊन तीन वर्ष झाली. तरी पुरस्काराचे वितरण झाले नाही, याबाबत निर्मला गोगटे व डॉ. रेवा नातू यांना पुरस्कार देण्यास विलंब झाल्याबद्दल काहीही कळविण्यात आलेले नाही. पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे कलाकारांना पुरस्कार प्रदान न करून ज्येष्ठ कलावंतांची महानगरपालिकेने थट्टाचं केली असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
बालगंधर्व पुरस्काराबाबत पालिकेची दिरंगाई..! कलाकारांची केली जातेय थट्टा
By श्रीकिशन काळे | Updated: January 14, 2025 09:33 IST