पिंपरी : चेंबरचे छिद्र साफ करत असलेल्या महापालिकेच्या कामगाराला कारने धडक दिली. यात कामगाराचा मृत्यू झाला. वाकड येथे सखाराम चौक ते भुजबळ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी (दि. १७ सप्टेंबर) सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मुकेश कोंडीराम रणपिसे (वय ४९) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी मनोहर बारकू शीतकल (४९, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिनेश श्रीधर वाळुंजकर (३८, रा. वाकड) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेला वाळुंजकर हा वाकड गावठाण येथील स्मशानभूमीत कामाला आहे. तर मुकेश रणपिसे हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कामाला होता.
मुकेश आणि फिर्यादी मनोहर शीतकल हे दोघेही बुधवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास वाकड येथील सखाराम चौक ते भुजबळ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काम करत होते. संशयित वाळुंजकर हा त्याच्या कारमध्ये होता. त्याने पुढे-मागे न पाहता गाडी सुरू केली. त्यानंतर त्याने गाडी पुढे घेतली. त्यावेळी चेंबरचे छिद्र साफ करत असलेल्या मुकेश यांना गाडीची धडक बसली. जखमी झालेल्या मुकेश यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक युवराज बनसोडे तपास करीत आहेत.