लक्ष्मण मोरे पुणे : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बेकार झालेल्यांसह व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांकरिता पालिका ‘स्किल डेव्हलपेंट प्रोग्रॅम’ राबविणार आहे. पालिकेच्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांमधून तरुणांसह रोजगार गमावलेल्यांना औद्योगिक तसेच व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन ‘आत्मनिर्भर ’करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याकरिता काही संस्थांशी बोलणी करण्यात येणार असून अर्थसाह्य, बँक कर्ज आदींबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.महापालिकेच्यावतीने शनिवार पेठेतील न. वि. गाडगीळ शाळेसह विविध ठिकाणी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालविली जातात. सद्यस्थितीत ही केंद्र बंद आहेत. याठिकाणी फर टॉईज तयार करणे, फोटोग्राफी, ब्युटी पार्लर, वायरिंग, दुचाकी आणि चारचाकी दुरुस्ती, फोटोग्राफी, मोबाईल दुरुस्ती, ब्यूटी पार्लर, स्पोकन इंग्लिश, संगणक हार्डवेअर, मशिन एम्ब्रॉयडरी, एमएस-सीआयटी, वेव्ह टॅली, टंकलेखन, फॅशन डिझायनिंग, एसी-फ्रिज दुरुस्ती, वेव्ह डीटीपी, वेव्ह सी बेसिक, वेव्ह वेब डिझायनिंग, चार चाकी ड्रायव्हिंग, माळीकाम, ऑटो कॅडचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु, मागील काही वर्षात येथील अनेक व्यवसाय प्रशिक्षण बंद पडले आहेत. तर, काही व्यवसाय प्रशिक्षण कालबाह्य झाले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. यासोबतच शाळा सोडलेल्या, नापास झालेल्या, शिक्षण अर्धवट राहिलेल्या तरुणांसमोरही रोजगाराचे प्रश्न उभे आहेत. या सर्वांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिल्यास ते उपजीविकेचे मार्ग शोधू शकतील, असा हेतू नजरेसमोर ठेवून ही महापालिका 'स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम' राबविणार आहे.बाजारपेठेतील आणि उद्योगविश्वातील मागणी व गरज लक्षात घेऊन अल्प मुदतीचे आणि १०० टक्के प्रॅक्टिकलवर आधारित प्रशिक्षण येथे विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. कालांतराने अभ्यासक्रमांचे पुनर्विलोक करून रोजगाराच्या दृष्टीने नवनवीन प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहेत. गुन्हेगारी आणि व्यसनाधीनतेकडे वळणाऱ्यांना स्वयंरोजगाराकडे वळण्याची संधी यानिमित्ताने मिळू शकणार आहे. नोकऱ्या नाहीत, रोजगार नाही; म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होऊ शकणार आहे.======महिलांनाही मिळेल स्वावलंबनाची संधीगरजू महिलांना येथे प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी होण्याची संधी आहे. फर टॉईज, ब्यूटी पार्लर, टंकलेखन, फॅशन डिझायनिंग या व्यवसायांच्या प्रशिक्षणाला महिला प्रवेश घेतातच; मात्र दुचाकी दुरुस्ती, फोटोग्राफी अशा वेगळ्या व्यवसायांचेही प्रशिक्षण त्या घेऊ शकणार आहेत.--------------कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरचा नारा दिला आहे. स्वत:चा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तसेच रोजगार गमावलेल्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काळाशी सुसंगत कोणते व्यवसाय प्रशिक्षण सुरू करण्यात येतील याबाबत सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात येणार आहेत. 'स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम'द्वारे रोजगार निर्मिती होऊ शकते.- मुरलीधर मोहोळ, महापौर
‘स्किल डेव्हलपमेंट’साठी पालिकेचे‘आत्मनिर्भर’अभियान; व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी करणार प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 22:35 IST
नोकऱ्या नाहीत, रोजगार नाही; म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
‘स्किल डेव्हलपमेंट’साठी पालिकेचे‘आत्मनिर्भर’अभियान; व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी करणार प्रयत्न
ठळक मुद्देअर्थसाह्य, बँक कर्ज आदींबाबतही केले जाणार मार्गदर्शन