पालिका सेवकांना १८९ टक्के महागाई भत्ता, दरमहा ५ कोटींचा भार पडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:12 IST2021-08-29T04:12:49+5:302021-08-29T04:12:49+5:30
पुणे : पुणे महापालिकेतील सुमारे १६ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सर्व सेवकांनाही १ जुलै, २०२१ केंद्र शासनाच्या सेवकांप्रमाणे सुधारीत ...

पालिका सेवकांना १८९ टक्के महागाई भत्ता, दरमहा ५ कोटींचा भार पडणार
पुणे : पुणे महापालिकेतील सुमारे १६ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सर्व सेवकांनाही १ जुलै, २०२१ केंद्र शासनाच्या सेवकांप्रमाणे सुधारीत दराने महागाई भत्ता मिळणार आहे़ यामुळे आता सर्व कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या १६४ टक्क्यांऐवजी १८९ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे़
पुणे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना १ नोव्हेंबर, १९७७ पासून केंद्र शासनाच्या सेवकांप्रमाणेच महागाई भत्ता दिला जात आहे़ तसेच केंद्र शासन यामध्ये ज्याप्रकारे सुधारणा करून नवीन बदल जाहीर करत आहे, त्याप्रमाणेच पुणे महापालिकेतील सेवकांनाही त्याचा लाभ दिला जात आहे़ महापालिकेच्या २३ डिसेंबर, १९७७ मधील सर्वसाधारण सभेत या अंमलबजावणीसाठी धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे़ त्यानुसार पुणे महापालिका आजही त्यानुसार कार्यवाही करीत आहे़
पुणे महापालिकेच्या सर्वच सेवकांना १ जुलै २०१९ पासून १६४ टक्के दराने महागाई भत्ता अदा केला जात आहे़ दरम्यान केंद्र शासनाने सदर महागाई भत्त्याच्या दरात वाढ करून तो १ जुलै २०२१ पासून लागू करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत़ त्यानुसार महापालिकेच्या सर्व सेवकांनाही १ जुलै, २०२१ पासूनचा महागाई भत्ता १६४ टक्क्यांऐवजी १८९ टक्के या दराने अदा होणार असून आॅगस्ट २०२१ च्या दोन महिन्यांच्या फरकाच्या रकमेसह तो अदा होणार आहे़
-------------------
महापालिकेच्या तिजोरीवर ५ कोटींचा भार
महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे १६ ते १७ हजार सेवकांना, प्रत्येकाच्या मूळ वेतनश्रेणीप्रमाणे १ जुलै २०२१ पासून १६४ टक्क्यांऐवजी १८९ टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे़ यामुळे दोन महिन्यांच्या फरकांचा साधारणत: १० कोटी रुपये व येथून पुढे दरमहा ५ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार महापालिकेच्या तिजोरीवर येणार आहे़
-----------------------------------