हडपसर : सध्या महापालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहत असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ही काँग्रेस आणि शिवसेनेला बरोबर घेऊन लढवण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी वानवडी येथील कार्यकर्ता मेळाव्यात दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे शहर कार्यकारिणीची ५० वी मासिक आढावा बैठक व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन वानवडी येथील महात्मा जोतिबा फुले सांस्कृतिक भवनात पार पडला. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी अंकुश काकडे, जगनाथ शेवाळे, जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, रवींद्र माळवदकर, बापूसाहेब पठारे, प्रशांत जगताप, रत्नप्रभा जगताप, अश्विनी पोकळे, प्रकाश म्हस्के आदी उपस्थित होते.
पुणे शहराचा चेहरा बदलला आहे. येथील दैनंदिन समस्या वाढलेल्या आहेत. रस्त्याने चालणे ही अवघड झाले आहे. बदल्यात पुण्यात ज्या ठिकाणी पाच लोक राहत होते त्याठिकाणी आजरोजी चारशे लोक राहत आहेत. मात्र, त्यांना तितक्या सुविधा मिळत नाहीत. पाण्याची सोय आहे का? आरोग्याची सोयीचे काय? कायदा सुविधा आहेत का? याची उत्तर शोधण्यासाठी महापालिका आहे. त्यामुळे महापालिका हातात घेऊन येथील समस्या सोडवावी लागणार आहे. त्यासाठी प्रयत्नाची परिकाष्ठा करू. सगळ्या जागा आपल्याला मिळणार नाहीत. मात्र, मित्रपक्षाशी बोलून त्या निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे पवार यांनी सांगितले. अंकुश काकडे यांनी प्रास्ताविक केले.
मेळाव्यात अजित पवारांना टोला
जागतिक पातळीवर पुणे शहराचा वाहतूक कोंडीत पाचवा क्रमांक आला आहे. या राजकारण्यांनी शहराचे वाटोळे केले आहे. उपमुख्यमंत्री यांना हडपसर मध्ये गल्लीबोळात फिरावे लागते. यावरून येथील कार्यकर्त्यांची मतदार संघात काय अवस्था आहे हे दिसून येत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना हटवून महाराष्ट्रातील २८ महापालिकांत जास्तीत जास्त नगरसेवक आपल्या पक्षाचे होतील, असे प्रतिपादन प्रशांत जगताप यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले.