वळणदार अक्षरासाठी महापालिकेचे प्रयत्न
By Admin | Updated: February 17, 2016 00:56 IST2016-02-17T00:56:05+5:302016-02-17T00:56:05+5:30
मुलांना मोफत शालेय साहित्य, व्यक्तिमत्त्व, कला-क्रीडा विकास करणे, त्याचबरोबर गुणवंतांना भरघोस बक्षिसे देण्याबरोबरच हस्ताक्षर सुधारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाने पुढाकार घेतला आहे

वळणदार अक्षरासाठी महापालिकेचे प्रयत्न
विश्वास मोरे, पिंपरी-चिंचवड
मुलांना मोफत शालेय साहित्य, व्यक्तिमत्त्व, कला-क्रीडा विकास करणे, त्याचबरोबर गुणवंतांना भरघोस बक्षिसे देण्याबरोबरच हस्ताक्षर सुधारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाने पुढाकार घेतला आहे. सुंदर हस्ताक्षरातून व्यक्तिमत्त्व अधिक खुलत असते. प्रभाव पडत असतो. त्यामुळे महापालिका शाळांतील मुलांचे हस्ताक्षर सुधारण्याचा आणि अक्षरवळण लावण्याचा प्रयत्न ‘हस्ताक्षर प्रकल्पा’तून केला जात आहे.
हस्ताक्षर हा शिक्षणाचा पाया आहे. अक्षरावरून व्यक्तिमत्त्वाची छाप पडत असते. महापालिकेच्या शाळांमध्ये सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. शिक्षण मंडळांतर्गत प्राथमिक विभागाच्या १२१, तर माध्यमिक विभागाच्या १८ शाळा आहेत. त्यात एकूण ४० हजार ७७६ मुले शिक्षण घेत आहेत.
हस्ताक्षर सुधार प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात इयत्ता पाचवी, सहावी, सातवीच्या वर्गांची निवड केली आहे. वर्षांतील दोन टप्प्यात हे प्रशिक्षण होते. पहिल्या चार महिन्यांत १४ आणि दुसऱ्या चार महिन्यांत २४ अशा एकूण २८ शाळांची निवड एका वर्षात केली जाते. प्रसिद्ध हस्ताक्षरतज्ज्ञ विजयकुमार मडजोडी यांच्या मार्गदर्शनाखाली किरण वत्स, शैला पाचपुते, गंगाबाई नरवडे, मनीषा दळवी, रोहिणी म्हाळस, मनीषा गायकवाड, पूजा वाकचौरे या प्रकल्पात काम करीत आहेत. या हस्ताक्षरतज्ज्ञांनी आजवर एकूण २५ हजार मुलांच्या अक्षरांना वळण लावले आहे. मुलांना अक्षर सुलेखनाची गोडी लावली आहे.
शाळांतील वर्गांची निवड केल्यानंतर सुरुवातीला कटनिपच्या साह्याने मुळाक्षरे लिहिण्याचा सराव केला जातो. गाठीच्या सरळ वळणाच्या अक्षरांचा सराव करून घेतला जातो. त्याचबरोबर अक्षरसमूह, रेषांचे सरावही करून घेतले जातात. देवनागरी, रोमन आणि करसिव्ह रायटिंगचा सराव घेतला जातो. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी, संस्कृत, हिंदी अक्षरलेखनाचा सराव केला जातो. धडे लिहिणे, शुद्धलेखनाचे नियमही शिकविले जातात.
शिक्षण मंडळ उपसभापती नाना शिवले म्हणाले, ‘‘संस्कारक्षम वयात अक्षरांचा संस्कार करण्याचा प्रयत्न हस्ताक्षर सुधार कार्यक्रमातून होत आहे. महापालिका शाळांतील मुलांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. जीवनात हस्ताक्षराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात भर पडणार आहे. सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवायला हवा.’’
या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिका शाळाही स्मार्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुलेखनाचा संस्कार व्यक्तिमत्त्व विकासात सुलेखनाचे महत्त्व आहे. त्यामुळे हस्ताक्षर प्रकल्प अधिक शाळांमध्ये राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना मिळेल.
- चेतन घुले, सभापती,
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ