महापालिकेचा डॅशबोर्डचा दावा म्हणजे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:10 IST2021-05-14T04:10:44+5:302021-05-14T04:10:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : डॅशबोर्डबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊ हे महापालिका प्रशासनाचे म्हणणे न्यायालयाची दिशाभूल करणारे आहे, अशी टीका ...

महापालिकेचा डॅशबोर्डचा दावा म्हणजे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डॅशबोर्डबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊ हे महापालिका प्रशासनाचे म्हणणे न्यायालयाची दिशाभूल करणारे आहे, अशी टीका आम आदमी पार्टीने (आप) केली. अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा हेच डॅशबोर्ड अद्ययावत नसल्याचे खरे कारण आहे, असा आरोप आपच्या पदाधिका-यांनी केला.
शहराध्यक्ष मुकुंद किर्दत म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड ताब्यात घेतले असे सांगण्यात येते. या रुग्णालयांमधील रिकाम्या बेडची माहिती देण्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयात एक किंवा दोन स्वतंत्र अधिकारी नियुक्त आहेत. त्यांच्याकडून काम केले जात नाही व प्रशासन वॉर रूममधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे, असे न्यायालयाला सांगत आहे.
हे अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे आहे, असा आरोप करून किर्दत म्हणाले, आपने हेल्प डेस्क तयार केला आहे. त्यातून रुग्णाच्या नातेवाईकांना बेड व अन्य मदत मिळवून देण्यासाठी साह्य केले जाते. खासगी रुग्णालयांनी त्यांची स्वतंत्र प्रतीक्षा यादी तयार केली आहे. महापालिकेला माहिती न देता ते परस्पर त्यांच्याकडील रिकामे बेड त्यांच्याशी संपर्क साधलेल्या बड्या रुग्णाला देऊन टाकतात. तिथे नियुक्त असलेले महापालिकेचे अधिकारी यावर काहीही भूमिका घेत नाहीत. रिकाम्या खाटांची माहिती देणारा महापालिकेचा डॅशबोर्ड आहे तसाच राहतो. यामुळे, विमा असलेल्या, प्रभावशाली रुग्णाला तत्पर सेवा व गरीब रुग्णाला कोणी वालीच नाही, अशी स्थिती शहरात निर्माण झाली असल्याचे आपचे म्हणणे आहे.
खासगी रुग्णालयाचे बेड ताब्यात म्हणजे त्याचे व्यवस्थापन ताब्यात हा अर्थ महापालिकेने लक्षात घ्यावा. कोरोना रुग्णांचे रुग्णालयातील प्रवेश एक खिडकी पद्धतीने ठेवावेत, अशा मागण्या आपने केल्या आहेत. मात्र आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य प्रमुख त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत, आता खुद्द उच्च न्यायालयाच्याच लक्षात त्यांचा ढिसाळपणा आला आहे. त्यामुळे आतातरी महापालिका प्रशासनाने कोरोना स्थितीबाबत थोडे गंभीर व्हावे व रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना साह्यभूत व्यवस्था तयार करावी, अशी पुणेकरांची अपेक्षा आहे असे किर्दत म्हणाले.
---
खासगी, सरकारी, महापालिका रुग्णालयांतील एकूण खाटांची संख्या (माहिती स्रोत: महापालिका)
* ऑक्सिजन बेड- ९,५००(कोविड सेंटरसह)
* आयसीयू बेड विथ ऑक्सिजन- ६७५
* आयसीयू बेड विथ व्हेंटिलेटर- ८०९