पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभागरचनेला सर्वाेच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठल्यानंतर फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावांची नगरपरिषद हाेईल, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दाेन गावे वगळून त्यांची नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने घेतला हाेता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले होते.
या पार्श्वभूमीवर विजय शिवतारे म्हणाले, पालिका हद्दीत १९९७ साली समाविष्ट केलेल्या गावांत विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे झाले नाहीत. २०१७ साली महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या अकरा गावांत अद्याप विकासकामे झाली नाही, त्यानंतर २०२१ साली महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या तेवीस गावांचा विकास आराखडा अद्याप झालेला नाही. यामुळे या गावांत पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याकडे शिवतारे यांनी लक्ष वेधले.
दुपटीपेक्षा जास्त कर आकारणी केली जाणार नाही
फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दाेन गावांप्रमाणे इतरही समाविष्ट गावांत चुकीच्या पद्धतीने मिळकत कर आकारणी झाली आहे. ग्रामपंचायतीच्या कालावधीत भराव्या लागणाऱ्या मिळकत करापेक्षा पालिकेच्या हद्दीत पाच पट अधिक मिळकत कर भरावा लागत आहे. यामुळे नागरिकांचा राेष वाढला आहे. समाविष्ट गावांतील मिळकतींना ग्रामपंचायतीच्या कालावधीतील मिळकत कराच्या दुपटीपेक्षा जास्त कर आकारणी केली जाणार नाही, असा निर्णय झाला आहे. या गावांतील विकासकामांकरिता मी राज्य सरकारकडून निधी महापालिकेला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही विजय शिवतारे यांनी सांगितले.