महापालिका हद्दवाढीचा प्रस्ताव अनिर्णित
By Admin | Updated: May 31, 2014 07:09 IST2014-05-31T07:09:00+5:302014-05-31T07:09:00+5:30
गतवर्षी आॅगस्टमध्ये नगरविकास खात्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित झाला होता
_ns.jpg)
महापालिका हद्दवाढीचा प्रस्ताव अनिर्णित
पिंपरी : गतवर्षी आॅगस्टमध्ये नगरविकास खात्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित झाला होता. देहू, आळंदी, चाकण, हिंजवडीसह २० गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याबाबतचा अभिप्राय शासनाने मागवला होता. त्यानुसार विविध राजकीय पक्षांच्या गटनेत्यांनी त्यास अनुकूलता दर्शवली होती, तर खेड तालुक्यातील गावे पिंपरी महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत विरोधाची भूमिका नोंदवण्यात आली होती. अशा परिस्थितीत महापालिकेने पाठवलेला प्रस्ताव शासनाकडे अद्याप प्रलंबित आहे. म्हाळुंगे इंगळे, निघोजे, मोई, कुरूळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, कडाची वाडी, चिंबळी, केळगाव, आळंदी, खालुंब्रे, देहू, विठ्ठलवाडी ही चौदा गावे, तसेच हिंजवडी, गहुंजे, माण, नेरे, मारुंजी, जांबे ही ६ गावे अशी मिळून २० गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याबाबत प्राथमिक टप्प्यात शासनाने महापालिकेकडून अभिप्राय मागवला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सदस्यांचे मत जाणून घेऊन हद्दवाढीस अनुकूल असल्याचा अभिप्राय शासनास कळविला. वर्षभरात या प्रस्तावावर शासनाकडून हालचाली झाल्या नाहीत. महापालिकेने हद्दवाढीस अनुकूलता दर्शवली असली, तरी खेड तालुक्यातील नागरिकांचा त्यास विरोध असल्याची भूमिका आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी व्यक्त केली होती. पुणे मनपात नव्याने ३४ गावे समाविष्ट करण्याचा शासनादेश निघाल्याने पिंपरी-चिंचवड मनपाच्या हद्दवाढीचा मुद्दा चर्चेत आला आहे. महापालिकेचे सध्याचे क्षेत्र १७० चौरस किलोमीटर आहे. नव्याने २० गावांचा समावेश झाल्यास हे क्षेत्र आणखी सुमारे ६० ते ७० चौरस किलोमीटरने वाढणार आहे. पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दवाढीचा शासनादेश काढला जातो की काय, अशी उत्कंठा नागरिकांनी व्यक्त केली. शासनाने यापूर्वी ११ सप्टेंबर १९९७ ला १८ गावांचा पालिका हद्दीत समावेश केला. त्यामध्ये तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, वडमुखवाडी, दिघी, दापोडी, भोसरी, सांगवी (उर्वरित), पिंपळे निलख, वाकड, पुनावळे, किवळे, मामुर्डी, चोविसावाडी, चºहोली, बोपखेल, रावेत आदी गावांचा समावेश होता. त्यानंतर जुलै २००९ला ताथवडेचा मनपात समावेश झाला.(प्रतिनिधी)