महापालिका आयुक्त हाजीर होऽऽऽ!
By Admin | Updated: May 4, 2016 04:21 IST2016-05-04T04:21:47+5:302016-05-04T04:21:47+5:30
महापालिका प्रशासनाकडून सफाई कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या तक्रारी संदर्भात अनुसूचित जाती-जमाती आयोगापुढे सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीसाठी

महापालिका आयुक्त हाजीर होऽऽऽ!
पिंपरी : महापालिका प्रशासनाकडून सफाई कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या तक्रारी संदर्भात अनुसूचित जाती-जमाती आयोगापुढे सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीसाठी महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी हजर राहण्याचा आदेश आयोगाच्या सदस्य सचिवांनी महापालिकेला बजावला आहे. त्यामुळे मंगळवारीच पदभार स्वीकारलेले नवीन आयुक्त दिनेश वाघमारे यांना या सुनावणीसाठी हजर राहावे लागणार आहे.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष सागर चरण यांनी महापालिका प्रशासनाकडून सफाई कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा पुरविल्या जात नसल्याची लेखी तक्रार आयोगाकडे केली आहे. त्यानुसार वेळोवेळी या आयोगाने महापालिका प्रशासनाकडे या प्रकरणाचा अहवाल मागविला होता. दरम्यान, राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष न्या. सी. एल. थूल यांच्यासमोर १५ फेब्रुवारी २०१६ ला सुनावणी झाली होती. या सुनावणीचे इतिवृत्त २३ फेब्रुवारीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. या सुनावणीकरिता अहवाल सादर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आठ दिवसांची मुदत मागितली होती.
मात्र, त्यानंतर ही मुदत संपून दोन महिन्यांचा कालावधी उलटला, तरीदेखील महापालिका प्रशासनाकडून या प्रकरणाचा अहवाल आयोगाला प्राप्त झालेला नाही. प्रशासनाच्या या निष्काळजीपणाची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. त्यावर आयुक्तांना २८ एप्रिलला आदेश देत महापालिका आयुक्तांनी सविस्तर अहवालासह उपस्थित ६ मे रोजी होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याबाबत कळविले आहे.
दरम्यान, तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांची नाशिक येथे बदली झाली आहे. (प्रतिनिधी)