मुंबईच्या आरोपीस जन्मठेप

By Admin | Updated: May 31, 2014 07:17 IST2014-05-31T07:17:10+5:302014-05-31T07:17:10+5:30

पोलिसांनी मांडलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा सुनावणार्‍या पुण्याच्या सत्र न्यायालयाने पोलिसांच्या श्वानाने दिलेल्या पुराव्यावरही शिक्कामोर्तब

Mumbai's accused life imprisonment | मुंबईच्या आरोपीस जन्मठेप

मुंबईच्या आरोपीस जन्मठेप

चाकण : पोलिसांनी मांडलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा सुनावणार्‍या पुण्याच्या सत्र न्यायालयाने पोलिसांच्या श्वानाने दिलेल्या पुराव्यावरही शिक्कामोर्तब करून खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, त्यामुळे खेड तालुक्यातील आव्हाट गावी तीन वर्षांपूर्वी मुलगा गमावलेल्या ६५ वर्षांच्या वृद्ध मातेला न्याय मिळाला आहे. या क्रूर खून खटल्यात वृद्ध मातेच्या न भिता देण्यात आलेल्या निर्भय साक्षीसोबतच पोलिसांच्या गुन्हे शोधक श्वान पथकातील ‘राणी’ श्वानाने काढलेला मागवर तपासणी वेळी आरोपीकडे थेट केलेल्या निर्देशाने या खटल्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मित्राच्या मावस बहिणीवर शेजारी राहणार्‍या तरुणाची वाईट नजर असल्याच्या संशयावरून मैनुद्दीन इमामुद्दीन शेख (२३, रा. आव्हाट, शेरेवाडी, ता. खेड, मूळ रा.वडाळा मुंबई) याने १७ एप्रिल २०११ रोजी धर्मा खंडू बुरुड (वय ३२ रा. आव्हाट, ता. खेड, जि.पुणे) याचा राहत्या घरासमोरील अंगणात खून केला होता. त्या प्रकरणी पुण्याच्या सत्र न्यायालयाने मैनुद्दीन इमामुद्दीन शेख यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आरोपी शेख आणि बुरुड कुटुंबीय यांच्या शेजारी राहणारे शिवाजी वाळुंज हे दोघे मित्र होते. शेख आणि वाळुंज हे दोघे मुंबईत एका कंपनीत कामाला होते. ते दोघेही मुंबईत एकत्रित राहत होते. मात्र, काही दिवसांनी वाळुंज आपल्या गावी (आव्हाट, शेरेवाडी, ता. खेड ) आला. आरोपी शेख 'तुज्या गावी यायचे आहे,' असे सांगून वाळुंजच्या घरी गावी आला होता. आरोपी शेख वाळुंज यांच्या कुटुंबीयांबरोबर राहू लागला. तो त्यांच्या बरोबर शेतात काम करत असे. वाळुंजची मावस बहीण त्यांच्याकडे शिकायला होती. वाळुंज याच्या घरी बुरुड कुटुंबीय आणि त्यांचा मुलगा धर्मा यांचे येणे-जाणे होते. आरोपी शेखला धर्मा बुरुड हा मित्राच्या बहिणीकडे वाईट नजरेने पाहतो, असा संशय होता. धर्मा शिवाजीच्या नातेवाईक महिलेची मस्करी करतो हे खुद्द शिवाजीलासुद्धा आवडत नव्हते. ही बाब त्याने शेखला सांगितली. मात्र वाळुंजच्या घरातील अन्य कुटुंबीयांनी त्यांना धर्मा चांगला मुलगा असल्याचे समजावले होते. मात्र शेख यास संशयाने पक्के पछाडले होते. त्याने धर्मा याचा काटा काढण्याचा निश्चय केला. व तो योग्य संधीच्या शोधात होता. घटनेच्या दिवशी (१७ एप्रिल २०११ रोजी) रात्री धर्मा आपल्या घराबाहेर खाटेवर झोपलेला असताना शेखने रात्री त्याला पहारीने भोकसले. शरीरावर जबरदस्त वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र तत्पूर्वी धर्माची जोराची किंकाळी व आवाज ऐकून त्याची आई सुंदराबाई खंडू बुरुड (वय ६५) बाहेर आली. तिने शेखला पळून जाताना पाहिले होते. (वार्ताहर)

Web Title: Mumbai's accused life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.