वीज बंद केल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:15 IST2021-08-28T04:15:08+5:302021-08-28T04:15:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क देऊळगावराजे : देऊळगावराजे येथे ऐन संकटात महावितरणने मागील दोन दिवस पूर्व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज ...

MSEDCL officials besieged due to power outage | वीज बंद केल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

वीज बंद केल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

लोकमत न्यूज नेटवर्क

देऊळगावराजे : देऊळगावराजे येथे ऐन संकटात महावितरणने मागील दोन दिवस पूर्व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज खंडित केली होती. याविरोधात शुक्रवारी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे अध्यक्ष अभिमन्यू गिरमकर व शिरापूरचे माजी सरपंच केशव काळे, हरीभाऊ ठोंबरे, शेतकरी संघटनेचे राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली देऊळगाव राजे येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता महावितरण अधिकाऱ्यांनी वीज पूर्ववत करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. गेल्या तीन दिवसांपासून महावितरणच्या शेतकऱ्यांची वीजबिल भरलेली नाही हे कारण दाखवून वीज बंद केली होती. पण गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी कोरोनामुळे त्रस्त आहेत. त्यात शेतीमालाला योग्य भाव नाही. अशातच आता मार्च महिन्यात शक्य असेल तेवढी बाकी शेतकऱ्यांनी वीजबिले भरली आहेत. पण शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिल भरण्याची राहिली नाही. त्यात वीजबिल भरण्यासाठी महावितरण कंपनी शेतकऱ्यांच्या मागे लागली आहे. त्यामुळे महावितरणच्या या कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घातला.

या वेळी केशव काळे, अभिमन्यू गिरमकर, हरिभाऊ ठोंबरे, राजेंद्र बुऱ्हाडे, बाळकृष्ण पाचपुते, शिवाजी काळे, नंदकिशोर पाचपुते, सचिन कदम, शेतकरी संघटनेचे राजेंद्र कदम आदी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. या सर्वांच्या मागण्यांचा विचार करून लाईट पूर्ववत करण्याचे आदेश दिले.

चौकट-

शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाणार आहे. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे सादर केल्या जातील. पुढील काळात अशी एकाकी वीज बंद केली जाणार नाही. जर वीज बंद करण्याची वेळ आली तर संबधित गावच्या शेतकरी वर्गाला आणि ग्रामस्थांना पूर्वकल्पना देऊन ग्रामसभेत शेतकऱ्यांना तशा सूचना केल्या जातील.

- जीवन ठोंबरे, सहायक अभियंता दौंड ग्रामीण महावितरण

चौकट :-

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणुकीच्या वेळी भर सभेत म्हणाले होते की सत्ता आल्यावर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यात येईल. परंतु तसे झाले नाही. सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. यामुळे राज्य शासनाने वीजबिल माफ करावे आणि पुरवठा खंडित करू नये.

-केशव काळे, भाजप नेते

चौकट :

आज सर्व शेतकऱ्यांनी मिळून केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. पुढील काळात शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहणार आहोत.

- अभिमन्यू गिरमकर, अध्यक्ष, किसान मोर्चा दौंड तालुका

Web Title: MSEDCL officials besieged due to power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.