MPSC च्या परीक्षेचा पात्रतेचा घोळ सुटेना! विराेधी पक्षनेते अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By प्रशांत बिडवे | Updated: April 20, 2023 16:48 IST2023-04-20T16:47:24+5:302023-04-20T16:48:06+5:30
एमपीएससीने डिसेंबर २०२२ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली हाेती...

MPSC च्या परीक्षेचा पात्रतेचा घोळ सुटेना! विराेधी पक्षनेते अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पुणे : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात पदभरतीसाठी महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने नुकतेच शुध्दीपत्रक प्रसिद्ध केले आहे मात्र, त्यातील शैक्षणिक अर्हतेनुसार पुन्हा जर्नालिझम विषयांत पदव्युत्तर पदवी धारकाचे अर्ज स्विकारले जात नाहीत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. त्यामध्ये जर्नालिझम विषयात पदवी तसेच पदविकाधारक यांच्यासह पदव्युत्तर पदवीधारकांना अर्ज करण्याची संधी द्यावी आणि त्यानंतरच भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली आहे.
एमपीएससीने डिसेंबर २०२२ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली हाेती. त्यामध्ये जर्नालिझम पदवी, किंवा इतर विषयांत पदवी आणि जर्नालिझम विषयांत पदविका अशी किमान शैक्षणिक अर्हता दिली हाेती. त्यामुळे केवळ जर्नालिझम विषयातील पदविका आणि, पदवीधारकांचे अर्ज स्विकारण्यात आले. मात्र, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडून शैक्षणिक अर्हतेस विराेध करण्यात आला. त्यानंतर आयाेगाने पुन्हा शुध्दीपत्रक संकेस्तथळावर प्रसिध्द केले. त्यातही केवळ १६ प्रकारच्या जर्नालिझम पदवी आणि पदविकांचा समावेश केला आहे. याबाबत पीजी उमेदवारांमध्ये असंताेष आहे.
जर्नालिझम विषयात पदवी, काेणत्याही विषयांत पदवी आणि जर्नालिझम पदविका तसेच काेणतीही पदवी आणि जर्नालिझम विषयात पदव्युत्तर पदवी ही शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा द्यावी आणि या बदलांसह अंतिम भरती प्रक्रिया राबविण्याची महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाला शिफारस करावी असे पत्रात नमूद केले आहे.