पुणे: खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी यांना संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार देण्यात आला. प्रथमच खासदार झाल्यानंतर पहिल्याच वर्षात त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते दिल्लीत महाराष्ट्र सदनमध्ये एका कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. खासदार कुलकर्णी राज्यसभेच्या खासदार आहेत. पदार्पणाच्या पहिल्या वर्षातच त्यांनी संसदीय कामकाजात सक्रिय सहभाग तर नोंदवलाच, शिवाय महिला आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय, वक्फ बोर्डाच्या संबंधित विषयांवर संसदेत सातत्याने मुद्देसूद भाष्य केले. हा सन्मान केवळ माझा नाही, तर जनतेच्या अपेक्षा संसदेत प्रभावीपणे मांडण्याच्या प्रयत्नांचा गौरव आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधीची खरी ओळख त्याच्या कृतिशीलतेत असते. लोकहितासाठी यापुढे परखडपणे भूमिका मांडत राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.