पुणे : वाहनांच्या तुलनेत मनुष्यबळाचा अभाव, त्यातच कामात कसूर केल्यामुळे निलंबित करण्यात आलेला कर्मचारी वर्ग यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाचाच (आरटीओ) फिटनेस ढासळला आहे. त्यामुळे दरमहा १२ हजार वाहने विना पासिंगची राहत आहेत. वाहनांचे पासिंग करण्याची सुविधा सुकर व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य वाहन मालक-चालक व प्रतिनिधी महासंघाच्या वतीने बुधवारी (दि. १९) आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शहरातील १ लाख ८० हजार वाहनांची दरवर्षी फिटनेस चाचणी करणे बंधनकारक आहे. वर्षातून सरासरी २७५ दिवस आरटीओचे कामकाज चालते. त्यामुळे सरासरी एका दिवसाला ६६० वाहनांची तपासणी होणे आवश्यक आहे. सध्या सरासरी तीनशे ते साडेतीनशे वाहनांचे पासिंग केले जाते. उर्वरीत वाहने विनापासिंग राहत आहेत. त्यामुळे दरमहा सुमारे १२ हजार वाहनांचे पासिंग होत नाही. शहरासाठी मोटार वाहन निरीक्षकांची ५८ पदे मंजुर आहेत. सध्या १७ अधिकारी निलंबीत आहेत. त्यामुळे २९ मोटार वाहन निरीक्षक अणि सहा मोटार वाहन निरीक्षकांवर वाहन तपासणीचा भार आहे. वाहनसंख्येच्या तुलनेत तपासणीसाठी अत्यल्प मनुष्यबळ आहे. विनापासिंग वाहन रसत्यावर आल्यास १४ हजार रुपयांचा दंड आहे. तसेच, अशा वाहनांचा अपघात झाल्यास विमा भरपाई देखील मिळत नाही. अशा दुहेरी कात्रीत वाहन चालक आणि मालक सापडले आहेत. याशिवाय दिवे घाटातील वाहन चाचणी ट्रक जवळ स्वच्छतागृह, शेड, कॅन्टीन अशी कोणतीच सुविधा नाही. पासिंगसाठी येणाऱ्या वाहनांनकडून देखील शंभर रुपये वाहन पार्किंग शुल्क आकारले जाते. ही अन्यायकारक प्रथा बंद करुन प्राथमिक सुविधा द्याव्यात अशी मागणी करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली. प्रकाश जगताप, चंद्रकांत हरफळे, प्रदीप भालेराव आणि बापू भावे या वेळी उपस्थित होते.
आरटीओच्या ‘फिटनेस’साठी आंदोलन; दरमहा १२ हजार वाहने विना पासिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 12:34 IST
शहरातील १ लाख ८० हजार वाहनांची दरवर्षी फिटनेस चाचणी करणे बंधनकारक आहे.
आरटीओच्या ‘फिटनेस’साठी आंदोलन; दरमहा १२ हजार वाहने विना पासिंग
ठळक मुद्देसरासरी एका दिवसाला ६६० वाहनांची तपासणी होणे आवश्यक २९ मोटार वाहन निरीक्षक अणि सहा मोटार वाहन निरीक्षकांवर वाहन तपासणीचा भार