मराठा उमेदवारांच्या नोकऱ्यांसाठी ‘महावितरण’समोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:29 IST2020-12-04T04:29:35+5:302020-12-04T04:29:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठा आरक्षण घटनापिठाकडे जाण्यापूर्वी जी प्रक्रिया झाली त्यात पात्र ठरलेल्या सर्व मराठा उमेदवारांना नोकरीवर ...

Movement in front of 'Mahavitaran' for jobs of Maratha candidates | मराठा उमेदवारांच्या नोकऱ्यांसाठी ‘महावितरण’समोर आंदोलन

मराठा उमेदवारांच्या नोकऱ्यांसाठी ‘महावितरण’समोर आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मराठा आरक्षण घटनापिठाकडे जाण्यापूर्वी जी प्रक्रिया झाली त्यात पात्र ठरलेल्या सर्व मराठा उमेदवारांना नोकरीवर घेत असल्याचे नियुक्ती पत्र तत्काळ द्यावे अशी मागणी करत मराठा क्रांची मोर्चाच्या वतीने ‘महावितरण’च्या रास्ता पेठेतील मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारत त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले.

तुषार काकडे, सचिन दरेकर, किशोर मोरे, बाळासाहेब आमराळे, कैलास आवारी, अनिल गोटे पाटील, दत्तात्रय यादव आदींनी आंदोलनात भाग घेतला. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार आणि महावितरणच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

महावितरणने राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणास अनुसरून नोकर भरती प्रक्रिया राबवली होती. लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचणी व मुलाखत या चाळण्यांमधून त्यात मराठा समाजातील ४९५ उमेदवार पात्र ठरले होते. त्यांना फक्त नियुक्ती पत्र देणे बाकी होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देऊन हा विषय घटनापीठाकडे सोपवला. त्याचा आधार घेत ‘महावितरण’ने पात्र उमेदवारांसह त्यांच्याकडची नोकर भरती प्रक्रिया थांबवली. त्यामुळे त्या उमेदवारांवर सर्व स्तरावर पात्र होऊनही अन्याय होत असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे म्हणणे आहे.

महावितरणने मराठा उमेदवारांना वगळून उपकेंद्र सहायक पदासाठी भरती प्रक्रिया राबवली. आधीच्या भरतीत लेखी परीक्षा, वैद्यकीय परीक्षा यात उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजाच्या सर्व पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी व नंतरची भरती मराठा समाजाला आरक्षण देऊन करावी, त्यातून समाजाच्या उमेदवारांना वगळू नये अशी मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे.

Web Title: Movement in front of 'Mahavitaran' for jobs of Maratha candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.