वादातून आईनेच घोटला दोन चिमुकल्यांचा गळा; पतीवरही केले कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:42 IST2025-02-08T17:41:07+5:302025-02-08T17:42:02+5:30
बाहेरच्या खोलीत झोपलेल्या नवऱ्याचा खून करण्याच्या मानसिकतेतून तिने त्याच्यावर कोयत्याने वार केला.

वादातून आईनेच घोटला दोन चिमुकल्यांचा गळा; पतीवरही केले कोयत्याने वार
दौंड/पाटेठाण/ भिगवण : पती-पत्नीमध्ये झालेल्या घरगुती वादातून रागाच्या भरात आईने दोन चिमुकल्यांचा गळा दाबून मारले. तसेच झोपेत असलेल्या पतीवर कोयत्याने वार करत स्वतः पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे शनिवारी पहाटे घडली असून, पतीला बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
शंभू ऊर्फ हर्ष दुर्योधन मिंढे (३), पियू दुर्योधन मिंढे (१) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत, तर पती दुर्योधन आबा मिंढे (३५) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी दौंड पोलिसांनी पत्नी कोमल दुर्योधन मिंढे (३०) हिला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुर्योधन मिंढे हे आयटी कंपनीमध्ये स्वॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. मात्र, दोन वर्षांपासून घरूनच वर्कफ्रॉम होम करत होते, तर कोमल हीदेखील बीएस्सी केमिस्ट्री झालेली आहे. दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते. शुक्रवारी रात्रीही पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर बेडरूममध्ये कोमल आणि तिची चिमुकली मुलगी पीयू झोपलेली होती. सर्वप्रथम तिने मुलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर अन्य एका खोलीत आजीजवळ मुलगा शंभू झोपलेला होता. या मुलाला उचलून तिने बेडरूममध्ये आणले आणि त्याचाही गळा आवळून खून केला.
त्यानंतर बाहेरच्या खोलीत झोपलेल्या नवऱ्याचा खून करण्याच्या मानसिकतेतून तिने त्याच्यावर कोयत्याने वार केला. यावेळी नवऱ्याने आरडाओरड केल्याने कोमल धावत आपल्या बेडरूममध्ये आली. तिने दरवाजा बंद करून घरातील चाकूने हाताच्या नस तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी घरातील लोकांनी दरवाज्याला धक्का दिल्याने दरवाजा उघडला आणि कोमल आत्महत्या करीत असताना तिला घरातील लोकांनी सावरले. मात्र यावेळी दोन चिमुकल्यांचा प्राण गेलेला होता.
दुर्योधनवर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची खबर मिळताच दौड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय कुंभार, पोलिस उपनिरीक्षक घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कोमल मिंढे हिला ताब्यात घेतले आहे.
दोन दिवसांपूर्वीच केला होता वाढदिवस
कोमल आणि दुर्योधन यांचा मुलगा शंभू याचा दोन दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यामुळे घरी आनंदाचे वातावरण होते, मात्र किरकोळ भांडण झाल्याने कोमल हिने एवढे मोठे टोकाचे पाऊल उचलल्याने आसपासची वस्तीवरील मंडळी आणि नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत.