Pune Surya Hospital: पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या निष्ठूर वागणुकीमुळे प्राण सोडावे लागल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. प्रसूतीपूर्व वेदना होत असल्याने रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेलेल्या तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांकडे मंगेशकर रुग्णालयाकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. हे पैसे भरू न शकल्याने भिसे यांना रुग्णालयाकडून उपचार नाकारण्यात आल्याचा आरोप होत आहे. मंगेशकर रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर तनिषा भिसे यांना वाकड येथील सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर तनिषा यांनी प्राण सोडले. जन्म घेताच आईच्या मायेला पोरक्या झालेल्या या बाळांच्या प्रकृतीबाबत आता सूर्या रुग्णालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
भिसे यांच्या जुळ्या बाळांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना सूर्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी म्हटलं आहे की, "प्रसूतीपूर्व वेदना असह्य झाल्याने तनिषा भिसे यांनी सातव्या महिन्यात या बाळांना जन्म दिला आहे. यातील एका मुलीचं वजन १ किला १२२ ग्रॅम इतकं आणि दुसऱ्या मुलीचं वजन ६४० ग्रॅम इतकं आहे. सुरुवातीला एका मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु सुदैवाने आता दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर आहे," असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, सातव्या महिन्यात या दोन्ही मुलींचा जन्म झाला असल्याने त्यांना सध्या एनआयसीयूमध्ये ठेवलं असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, काय कारवाई होणार?
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. याबाबत आता सरकारकडून सदर रुग्णालयावर काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.