पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीबाबत चर्चा असून, आता यावर शहराच्या मध्यवर्ती भागातील सुमारे ६० गणेश मंडळांनी एकत्रित भूमिका जाहीर केली आहे. ही मंडळे सकाळी सात वाजल्यापासून लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती मंडळांच्या प्रतिनिधींनी दिली. त्यामुळे या निर्णयावरून मानाची मंडळे काय निर्णय घेतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. मानाच्या मंडळांच्या निर्णयावर विसर्जन मिरवणुकीची वेळ अवलंबून राहणार आहे. याबाबत मंडळांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला.
यंदाच्या मिरवणुकीत मानाच्या पाच गणपतींपाठोपाठ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ आणि अखिल मंडई मंडळाने लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय जाहीर केल्यापासून इतर मंडळांनी यावर नाराजी व्यक्त करत आपली भूमिका जाहीर केली. यावर मानाच्या गणपती मंडळांसह इतर गणेश मंडळांच्या प्रतिनिधींसोबत पोलिस आयुक्तांनी बैठक घेतली होती, परंतु त्यावर तोडगा निघाला नाही. यातच आता शहराच्या मध्यवर्ती भागातील ६० मंडळांनी एकत्रित भूमिका जाहीर करीत सकाळी ७ वाजताच मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या मंडळाद्वारे बेलबाग चौकातून सकाळी सात वाजता मिरवणुकीची सुरुवात करून दुपारी १२ ते १ पर्यंत लक्ष्मी रस्ता मोकळा करण्यात येणार असल्याचेही त्यांंनी यावेळी सांगितले.
लोकप्रतिनिधींनी मंडळांशी साधला नाही संपर्क
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीबाबत वाद सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार हेमंत रासने बैठक घेणार आहेत. यावर सर्व मंडळे मिळून काहीतरी निर्णय घेतील. मात्र, अद्याप कोणत्याही लोकप्रतिनिधींनी मंडळांशी संपर्क साधलेला नाही, असेही मंडळांनी सांगितले.
सकाळी सातच्या मिरवणुकीत या मंडळांचा सहभाग
श्री त्वष्टा कासार मंडळ, बढाई समाज मंडळ, धक्क्या मारुती मंडळ, होनाजी तरुण मंडळ ट्रस्ट, जुन्या जाईचा गणपती मंडळ, मुठेश्वर मंडळ, जगोबा दादा तालीम मंडळ, वीर हनुमान मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ, रामेश्वर चौक मित्र मंडळ, सराफ सुवर्णकर मंडळ, जनार्दन पवळे संघ, रणमर्द मंडळ, माती गणपती मंडळ, गणेश सेवा मंडळ, वैभव मित्र मंडळ, गणेश आझाद मंडळ, सुभाष मित्र मंडळ, वीर महाराणा मंडळ, श्रीराम अभिमन्यू मंडळ, कापडगंज मंडळ, जय भारत मंडळ, मेहुणपुरा मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, बाल साईनाथ मित्र मंडळ, अकरा मारुती कोपरा, योजना मित्र मंडळ, सहकार तरुण मंडळ, बाल समाज मंडळ, श्रीबाल मित्र मंडळ, विजय शिवाजी मंडळ, हसबनिस बखळ सार्वजनिक गणेश मंडळ आणि लोकशिक्षण मित्र मंडळ.
एक गणपती – एक पथक
या मंडळांकडून मागील काही दिवसांपासून एक मंडळ एक पथक अशी मागणी होत होती. मानाच्या गणपती मंडळांसमोर ३ ते ४ पथके लावली जातात, त्यामुळे मिरवणुकीला उशीर होतो. त्यावर मध्यवर्ती भागातील मंडळांनीच निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. या पद्धतीमुळे साधारण दीड वाजेपर्यंत लक्ष्मी रस्ता संपूर्ण मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
ढोल-ताशा महासंघाचा पाठिंबा
मागील अनेक दिवसांपासून ‘एक मंडळ एक पथक’ यावर चर्चा सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीत शहरातील सर्व मंडळे संगनमताने जो निर्णय घेतील त्याला महासंघाचा पाठिंबा असणार आहे, अशी माहिती ढोल-ताशा महासंघाच्या वतीने देण्यात आली.