माननीयांचा नव्या भागावर अधिक भर
By Admin | Updated: February 15, 2017 02:23 IST2017-02-15T02:23:17+5:302017-02-15T02:23:17+5:30
नव्याने तयार केलेल्या प्रभागात जुन्या दोनच्या प्रभागातील बराच भाग आला असल्याने त्या ठिकाणी मतदारांना आपण परिचित आहोत़

माननीयांचा नव्या भागावर अधिक भर
पुणे : नव्याने तयार केलेल्या प्रभागात जुन्या दोनच्या प्रभागातील बराच भाग आला असल्याने त्या ठिकाणी मतदारांना आपण परिचित आहोत़ त्या मानाने नव्या भागातील मतदारांपर्यंत पोचण्याचा व त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने देऊन आकर्षित करण्याकडे विद्यमान नगरसेवकांचा प्रामुख्याने प्रयत्न आहे़ जुन्या भागातील मतदार नाराज असल्याने नकारात्मक मतदानाचा फटका बसण्याची अनेकांना भीती वाटत असून, त्यामुळे त्या भागात होणारा तोटा नव्या भागातून भरून काढण्याचा बहुतेकांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे़ याला काही माननीय अपवाद आहेत़ प्रभाग पद्धतीचा माननीयांना एकप्रकारे फायदाच होत असल्याचे दिसून येत आहे़
मागील काही वर्षांपासून आपल्या कामावर आणि जनसंपर्कावर पुढच्या निवडणुकीत मत मागण्याऐवजी लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या देवदर्शनाच्या यात्रा आयोजित करणे, ज्येष्ठ नागरिक, मुलांसाठी सहली आयोजित करुन त्यांना आपलेसे करण्यावर नगरसेवकांचा भर आहे़ अशा सहली, यात्रांमध्ये सहभागी न होणाऱ्या मतदारांची संख्या मोठी असते़ त्यांची कामे न झाल्याने नाराजी ओढविण्याची शक्यता असून, मागील वेळेला ज्यांनी मते दिली, ते यंदा देतीलच अशी खात्री अनेक माननीयांना वाटत नाही़ त्यामुळे प्रभाग पद्धतीचा त्यांना फायदाच झाला
आहे़ (प्रतिनिधी)